Mumbai News :…होय आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत – संजय राऊत

एमपीसी न्यूज – राम मंदिर जमीनीचा कथित गैरव्यवहार यावरून शिवसेनेचे मुखपत्र सामनातून टीका करण्यात आली होती. यावरून भाजप कार्यकर्ते शिवसेना भवनासमोर आंदोलन करण्यासाठी गेले. मात्र, दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यात राडा झाला. त्यानंतर भाजपने शिवसेनेवर गुंडगिरी व सत्तेचा माज असल्याचा आरोप केला. त्याला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी होय आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत अशी प्रतिक्रिया दिली आहे.

‘होय, आम्ही गुंड आहोत. ते सांगण्यासाठी आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. आम्ही सर्टिफाईड आहोत. महाराष्ट्राच्या अस्मितेच्या बाबतीत हिंदुत्वाच्या बाबतीत आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत,’ असं संजय राऊत म्हणाले आहेत.

दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यात झालेल्या राड्यानंतर पत्रकारांनी संजय राऊतांना विचारणा केली असता त्यांनी विरोधकांना परखड शब्दांमध्ये सुनावलं आहे. “होय शिवसेना गुंडगिरी करते. पण त्याला सत्तेचा माज म्हणणं चुकीचं आहे. सत्तेचा माज दाखवून राडा झाला असता, तर तो खूप वेगळ्या पद्धतीने झाला असता. आमच्या शिवसेना भवनाच्या दिशेनं कुणी चाल करत असेल, तर होय आम्ही गुंड आहोत. ते सांगण्यासाठी आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. आम्ही सर्टिफाईड आहोत. महाराष्ट्राच्या अस्मितेच्या बाबतीत, हिंदुत्वाच्या बाबतीत आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत. ही गुंडगिरी मराठी माणसाने केली म्हणून मुंबई महाराष्ट्रात राहिली. आम्ही ही गुंडगिरी केली म्हणून महाराष्ट्रात, मुंबईत मराठी माणसाचा आवाज आहे”, असं राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, शिवसेना भवनासमोर भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्यानंतर मोठा राडा झाला. या प्रकरणी माहीम पोलीस स्थानकात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.