Mumbai News : राज्यातील सर्व सरपंचपदाचे आरक्षण रद्द !

एमपीसी न्यूज : राज्यात सुमारे 14 हजार ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीविषयी गेल्या दोन दिवसापासून चर्चा सुरू होती. त्या चर्चेला पूर्ण विराम मिळाला असून, ज्या जिल्ह्यात आरक्षण सोडत झाली आहे ते रद्द करून निवडणुकीनंतर सर्व जिल्ह्यात नव्याने आरक्षण सोडत कार्यक्रम राबवा, असे आदेश ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

नवीन वर्षात 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. पुणे जिल्ह्यासह राज्यातील आठ जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. आरक्षीत सरपंच पदाच्या जागेसाठी इच्छुक उमेदवारांनी तयारीही सुरु केली होती.

राज्यात सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर झाल्याने त्या-त्या आरक्षित जागेवर आपली किंवा आपल्या पत्नीची वर्णी लागावी, तसेच जातीचे दाखले काढण्यापासून वार्डातील कार्यकर्त्यांची जुळवा-जुळव केली जात आहे.

आता आपले सरपंच पद निश्चित, असे गृहीत धरून अनेक इच्छुक तयारीला लागलेले आहेत. मात्र, राज्यातील संपूर्ण आरक्षण सोडतच रद्द केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.