Mumbai News : राज्यात 15 दिवसांच्या ‘लॉकडाऊन’ची शक्यता ; रविवारच्या बैठकीत अंतिम निर्णय

कडक निर्बंधाला पर्याय नसल्याचे मुख्यमंत्र्यांचे मत

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात पंधरा दिवसांचा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. कोरोनाचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडले आहे.

राज्यातील कोविड परिस्थिती आणि उपाययोजना यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते व मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी साधला ई-संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

एका बाजूला जनभावना, तर दुसऱ्या बाजूला कोरोनाचा उद्रेक. अशा परिस्थितीत ही लढाई जिंकायची असेल तर थोडी कळ तर काढावीच लागेल. जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन जो काही निर्णय घेतला जाईल. त्याला सर्वपक्षीय नेत्यांनी सहकार्य करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

उद्या (रविवारी) टास्क फोर्ससोबत बैठक घेण्यात येणार असून त्यानंतर याबद्दल निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जवळपास दोन तासांपेक्षा अधिक वेळ मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक घेतली. कोरोना रोखण्यासाठी कडक निर्बंध की लॉकडाऊन यावर ही चर्चा झाली.

आजच्या बैठकीत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. मात्र, लॉकडाऊन करण्याअगोदर सर्वसामान्यांच्या बाबतीत विचार करावा. त्यांना मदतीची तरतूद करावी, अशी भूमिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडली, अशी माहिती भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.