IPL News : पंजाब नव्हे मुंबईच ठरले किंग्ज, सहा गडी राखून मिळवला विजय

एमपीसी न्यूज : (विवेक कुलकर्णी) मुंबई इंडियन्सला आज कुठल्याही परिस्थितीत अंतीम चार मध्ये राहण्यासाठी विजय हवा होता, जो त्यांनी झुंजार खेळ करून पंजाब किंग्ज 11 वर सहा गडी राखून मिळवलेल्या मोठया विजयाने साध्य झाला. अष्टपैलू कामगीरी करणारा पोलार्ड, आणि पुनरागमन करणाऱ्या सौरभ तिवारी सह हार्दिक पंड्या ठरले विजयाचे मुख्य शिल्पकार.

आजच्या दिवसातल्या दुसऱ्या सामन्यात प्रतिष्ठा पणाला लागल्याने मुंबई इंडियन्सला कुठल्याही परिस्थितीत विजयी होऊन स्वतःला सिद्ध करून दाखवायचे होते, यात एक गोष्ट मुंबई इंडियन्सच्या साठी चांगली होती ती म्हणजे समोरची टीम किंग्ज 11 पंजाब होती, जि होता तोंडाशी आलेला विजय पराभवात रूपांतरीत करण्यात जास्त आनंद मिळते अशी खात्री वाटावी असा त्यांचा खेळ असतो खास करून विजय हमखास त्यांचाच असेल असे वाटत असते.

आज मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. किंग्ज 11 पंजाबने आज मयंकच्या जागी मनदीप सिंगला तर मुंबई इंडियन्सने ईशान किशन ऐवजी सौरभ तिवारीला संधी दिली. के एल राहुल सोबत मनदीपने सलामीला खेळताना 36 धावांची सलामी दिली,पण मनदीपने इथेच कर्णधार राहूलची साथ सोडली.

त्याने कुनाल पंड्याच्या गोलंदाजीवर पायचीत होण्याआधी वैयक्तिक 14 चेंडूत 15 धावा केल्या, त्यानंतर आलेल्या ख्रिस गेलला काही विशेष कामगीरी करता आली नाही, त्याचा खेळ पोलार्डने तमाम करताना त्याला केवळ एकाच धावेवर तंबूत पाठवले. त्यातून सावरण्या आधीच कर्णधार राहुलने सुद्धा आपली विकेट गमावली. बिगबर्ड पोलार्डने या दोघांच्या विकेट्स एकाच षटकात मिळवून पंजाबच्या डावाला मोठे हादरे दिले.

प्रतिभावंत म्हणवल्या जाणाऱ्या निकोलस पुरनने प्रतिभा दाखवण्या ऐवजी कर्णधाराच्या पावलावर पाऊल ठेवून तंबूत परतने पसंद केले. त्याला बुमराहने चकवले. चार बाद 48 अशी कठीण अवस्था झाल्यावर पंजाब किंग्जला सावरले ते मारक्रम आणि दीपक हुडाने. या दोघांनी संघाला सावरताना 61 धावांची भागीदारी केली, पण इथेच मारक्रम वैयक्तिक 42 धावांवर बाद झाला आणि सोबत पंजाबच्या आशाचा चकनाचुर झाल्या.  5 बाद 109 धावा असताना नंतरच्या पाच षटकात किंग्ज पंजाबला केवळ 24 धावाच जोडता आल्या ज्यामुळे त्यांची अवस्था निर्धारित 20 षटकात केवळ 135 धावाच करता आल्या. मुंबईसाठी पोलार्ड आणि बुमराहने उत्कृष्ट गोलंदाजी करत प्रत्येकी दोन बळी घेतले.

स्पर्धेत टिकून राहयचे असेल तर विजय मिळवायलाच हवा अशी मुंबई इंडियन्सची निकड असताना मुंबई इंडियन्सची सुरुवात अजिबात चांगली झाली नाही. कर्णधार रोहित चौथ्याच षटकात केवळ आठ धावा करून  रवी बिष्णोईचा बळी ठरला तर दुसऱ्याच चेंडुवर लय हरवलेला सुर्यकुमार यादव शून्य धावावर बाद झाला अन मुंबई इंडियन्सच्या गोटात एकच खळबळ उडाली.

पुन्हा एकदा निराशा पदरात येते की काय असे वाटत असतानाच सौरभ तिवारी आणि डीकॉकने समजून उमजून खेळत डाव सावरला. या जोडीने 45 धावांची भागीदारी केली असताच डीकॉक सुद्धा वैयक्तिक 27 धावा करून मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर बाद झाला.

यानंतर हार्दिक पंड्या फलंदाजीसाठी आला, त्याला खूप काही सिद्ध करून दाखवायचे होते, असे म्हटले जाते बहादूर खेळाडू आपल्या संघाला गरज असताना आपला असली खेळ करून दाखवतात, त्याचे प्रत्यंतर दाखवताना हार्दिक पंड्याने जबरदस्त खेळी करून आपल्या फीट असण्याचे शुभसंकेतही दाखवले, पण त्याला तितकीच तोलामोलाची साथ सौरभ तिवारीने दिली.

सौरभने 37 चेंडूत 45 धावा करताना तीन चौकार आणि दोन उत्तुंग षटकार मारले. दुर्दैवाने चांगले खेळत असतानाही तो आपले अर्धशतक करू शकला नाही आणि तो एलीसच्या गोलंदाजीवर यष्टीमागे राहुलकडे झेल देऊन बाद झाला.पण त्याने आपले काम बऱ्यापैकी पार पाडले होते.

पण  विजय अगदी सोपा नव्हता, उरलेल्या 29 चेंडूत मुंबईला 43 धावा हव्या होत्या,त्याही शमी आणि कम्पनी पुढे, आणि कठीण बाब म्हणजे पोलार्ड आणि हार्दिक दोघेही फॉर्म आऊट वाटत होते, पण या दोन चॅम्पियन खेळाडूनी योग्य वेळी योग्य खेळ करत संघाला सहा गडी आणि सहा चेंडू राखून विजय मिळवून दिला आणि या विजयासोबत पाचवे स्थानही, त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या अंतिम चार संघात असण्याच्या आशा अजुनही जिवंत राहिल्या आहेत.

हार्दीक पंड्याने 30 चेंडूत नाबाद 40 धावा करताना दोन तडाखेबाज षटकार आणि चार खणकणीत चौकारही मारले तर पोलार्डने सुद्धा नाबाद 15 धावा त्याही केवळ सात चेंडूत करत आपले अष्टपैलूत्व सुध्दा सिद्ध केले, जे त्याला सामनावीर हा किताब सुद्धा देऊन गेले, पंजाबची जिंकता जिंकता हारण्याची सवय आजही कायम दिसली, अर्थात हे दोन्ही संघ अजूनही अंतिम चार मध्ये आहेत की नाही हे कळायला आणखी काही सामने व्हायची वाट बघावी लागेल,बघणार ना?

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.