Mumbai : पोलीस आयुक्तालयाच्या प्रस्तावातच असंख्य त्रुटी; नव्याने प्रस्ताव तयार करण्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांचे आदेश

एमपीसी न्यूज – मनुष्यबळ व गाड्या यांच्या संदर्भात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी तयार करण्यात आलेल्या प्रस्तावात असंख्य त्रुटी असल्याने नव्याने प्रस्ताव तयार करण्यात यावा, असे आदेश मुंबई पोलीस मुख्यालयात झालेल्या बैठकीत देण्यात आले आहेत.

महाराष्ट्र राज्याचे कायदा-सुव्यवस्था विभागाचे प्रमुख अतिरिक्त महासंलाचक परबीर सिंग यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बठकीसाठी नियोजन व समन्वय विभागाचे अतिरिक्त महासंचालक धनंजय कमलाकर, आस्थापना विभागाचे अतिरिक्त आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, पुणे शहर सहआयुक्त शिवाजी बोडखे, पिंपरी-चिंचवडचे अतिरिक्त आयुक्त मकरंद रानडे, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील आदी उपस्थित होते.

पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासंदर्भात महत्त्वाच्या बाबींवर चर्चा झाली. ज्या प्रस्तावावरून मनुष्यबळ, वाहने दिली गेली. त्या प्रस्तावातच असंख्य त्रुटी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे आता पिंपरी-चिंचवड शहर आणि नव्याने जोडल्या गेलेल्या ग्रामीण पोलीस दलातील पाच पोलीस ठाण्यांच्या भागासाठी आवश्‍यक मनुष्यबळ व वाहनांच्या गरजेनुसार नवा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. त्याच बरोबर पिंपरी-चिंचवडसाठी नव्याने पोलीस भरती प्रक्रिया राबविण्याऐवजी अन्य जिल्ह्यातून शहरात येण्यासाठी इच्छुक असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यासाठी हिरवा कंदील या बैठकीत दाखविण्यात आला. या बैठकीत चर्चा झालेल्या मुद्‌द्‌यांवर अंतिम निर्णय होण्यापूर्वी आणखी एक बैठक होणार असून, त्यामध्ये येणा-या सर्व अहवालांवर अंतिम तोडगा काढण्यात येणार आहे.

शहर-ग्रामीणची हद्द विभाजन करताना तेथे असलेल्या मनुष्यबळ, वाहने यांचे विभाजन योग्य प्रकारे झाले नाही. आयुक्तालयाचा प्रस्ताव तयार करताना झालेल्या त्रुटींचाच आधार घेऊन पुणे शहर-ग्रामीण पोलीस प्रमुखांनी पिंपरी-चिंचवडसाठी मनुष्यबळ आणि वाहने दिली. महत्त्वाचे म्हणजे यातील बहुतांश वाहने ही कामचलावू असल्याचे अवघ्या चार महिन्यात उघड झाले. याबाबत पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.