Mumbai: पालघर हत्या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन प्रकरण भडकवू नये -मुख्यमंत्री; सर्व हल्लेखोर तुरुंगात

सीआयडी कसून तपास करीत आहे

एमपीसी न्यूज – पालघर येथे तीन जणांची जमावाने ठेचून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करून यातील प्रमुख 5 हल्लेखोर आणि सुमारे 100 जणांना पकडले असून गुन्हा अन्वेषण विभाग कसून तपास करीत आहे. मृतांमध्ये दोन साधू होते. मात्र, या प्रकरणाला कुणीही धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नये, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. ते आज सोशल मिडीयाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होते.

सध्या आम्ही कोरोनाचे युद्ध नेटाने लढत आहोत. काही जण या घटनेवरून सोशल मिडीयाच्या माध्यमातून वातावरण तापवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मी याविषयी गृहमंत्री अमित शहा यांना सकाळी दूरध्वनीवरून बोलून सर्व कल्पना दिली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

या घटनेवर अधिक भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले की 16 तारखेस कासा पोलीस ठाणे हद्दीत ज्या ठिकाणी हा घृणास्पद प्रकार घडला तेथून अवघे काही मीटर अंतरावर दादरा नगर हवेली या केंद्र शासित प्रदेशाची सीमा सुरु होते. संबंधित साधू आणि त्यांच्याबरोबरची मंडळी या सीमेवरून जात असतांना तेथील पोलिसांनी एवढ्या मध्यरात्री त्यांना अडवून परत पाठवले आणि ते परतत असतांना या दुर्गम ठिकाणी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.

हा हल्ला गेल्या काही दिवसांपासून त्या भागात पसरलेल्या अफवेमुळे गैरसमजुतीने झाला. हा भाग पालघर पासून 110 किमी अंतरावर आहे. मात्र, महाराष्ट्र पोलिसांनी अतिशय तातडीने याठिकाणी धाव घेतली. आणि दिवसभरात 100 पेक्षा जास्त लोकांना पकडले, त्यात 9 अल्पवयीन मुले असून त्यांना रिमांड होम मध्ये पाठवण्यात आले आहे. उर्वरित हल्लेखोर तुरुंगात असून अतिशय कठोर कारवाई करणार आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

दोन पोलीस कर्मचाऱ्यांना याप्रकरणी निलंबितही केले आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, माझे गृहमंत्री त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशीही बोलणे झाले आहे. याठिकाणी कुठलाही धार्मिक संदर्भ नाही. तसेच जातीय वळण देणे अतिशय चुकीचे आहे, असे आपण त्यांना सांगितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पोलिसांवर देखील या जमावाने हल्ला केला तसेच त्यांच्या वाहनांची नासधूस केली असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.