Mumbai : प्लाझ्मा थेरेपीचा पहिला प्रयोग केलेल्या ‘त्या’ रुग्णाचा मृत्यू!

एमपीसी न्यूज – लीलावती रुग्णालयातील 52 वर्षीय रुग्णावर प्रथमच शनिवारी प्लाझ्मा थेरेपीचा प्रयोग करण्यात आला होता. प्लाझ्मा थेरेपीचा पहिला प्रयोग केलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत करोनाबाधित रुग्णांवर रक्तद्रव उपचाराचा (प्लाझ्मा थेरपी) प्रयोग प्रथमच शनिवारी लीलावती रुग्णालयातील 52 वर्षीय रुग्णावर करण्यात आला होता. अखेर त्या रुग्णाचा आज मृत्यू झाला.

ताप, सर्दी आणि फुप्फुसाचा संसर्ग झाल्याने 52 वर्षीय रुग्णाला 20 एप्रिलला वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. चाचण्यांमध्ये त्या व्यक्तीला करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झालं होतं. त्यानंतर या रुग्णाला कृत्रिम श्वसनयंत्रणेवरही ठेवण्यात आलं आहे. त्यानंतर रुग्णालयानं पालिकेकडे त्यांच्यावर प्लाझ्मा थेरेपीचा प्रयोग करण्याची परवानगी मागितली होती.

रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी हे उपचार केले जात असल्याने पालिकेने प्लाझ्मा थेरेपी देण्यास मंजुरी दिली. त्यानुसार शनिवारी नायर रुग्णालयात करोना संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांनी दान केलेले प्लाझ्मा लीलावती रुग्णालयाला देण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी त्या रुग्णावर पहिली प्लाझ्मा थेरेपीचा प्रयोग करण्यात आला होता. आज अखेर त्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

कॉनव्हॅलसंट प्लाझ्मामध्ये करोना व्हायरसमधून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या शरीरातील अ‍ॅंटीबॉडीज असलेले रक्त काढून ते करोनाग्रस्त रुग्णांवर वापरले जाते. Covid-19 चे रुग्ण या नव्या थेरपीला चांगला प्रतिसाद देत असून ही उपचार पद्धती लागू पडत असल्याचे अमेरिकन जर्नलमध्ये म्हटले आहे. सर्वप्रथम चीनमध्ये या थेरपीने उपचार करण्यात आले.

चीनमध्ये करोनाची लागण झालेल्या पाच रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. पण, 12 दिवसांच्या आत त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. नव्या उपचार पद्धतीमध्ये करोनाची बाधा झालेल्या रुग्णांवर करोना मुक्त रुग्णाचे रक्त वापरण्यात येते. करोना व्हायरसच्या रुग्णांसाठी हा एक आशेचा किरण आहे असे या उपचार पद्धतीचे नेतृत्व करणाऱ्या एका डॉक्टराने सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.