Mumbai : पोलीस बांधवांनो! वय 55 पेक्षा अधिक आणि शारीरिक व्याधी असतील तर घरीच बसा; मुंबई पोलीस आयुक्तांचा निर्णय

एमपीसी न्यूज – वय वर्ष 55 आणि त्यापेक्षा अधिक असेल आणि जर शारीरिक व्याधी असतील तर पोलिसांना घरी राहण्याचा सल्ला मुंबई पोलीस आयुक्तांनी दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या विरोधात फ्रंट लाईनवर लढणाऱ्यांमध्ये पोलिसांचा समावेश होतो. त्यात कोरोना विरोधात लढताना तीन पोलिसांना आपला जीव गमवावा लागला असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना विरुद्धच्या लढाईत डॉक्टरांसोबत पोलीस देखील फ्रंटलाईनवर लढत आहेत. काही पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर काहीजण यातून बाहेर आले आहेत. यात कोरोनाची लागण होऊन तीन पोलिसांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांनी पोलिसांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

_MPC_DIR_MPU_II

ज्या पोलिसांचे वय 55 आणि त्यापेक्षा अधिक आहे आणि त्यांना जर शारीरिक व्याधी असतील तर त्यांनी घरीच थांबावे. 55 आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्या पोलिसांना कोणताही त्रास नसेल तर ते स्वेच्छेने कर्तव्यावर हजर राहू शकतात. वरिष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्तावर येऊ नये. पोलिसांच्या अनुपस्थितीत त्यांचा हा कालावधी अर्जित रजा म्हणून गणण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

पोलीस आयुक्तांच्या निर्णयात म्हटले आहे की, 55 वर्षांहून अधिक वय असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घरीच थांबावे. 52 वर्षांवरील पोलीस अधिकारी ज्यांना मधुमेह, हायपर्टेंशनचा त्रास आहे. त्यांनीही गरीच थांबावे. 3 मे पर्यंत पोलीस स्थानकांमध्ये तैनात असणारे अधिकारी, कर्मचारी, कॉन्स्टेबल हे 12 तास ड्युटी आणि 24 तास रेस्ट शिफ्ट या तत्वावर काम करतील.

पोलिसांसाठी खास रुग्णालयांची तरतूद करण्यात आली आहे. कोविड रुग्णालयांमध्येही पोलिसांसाठी विशेष तरतूद असेल. फ्रंटलाईन ड्युटीवर असणाऱ्यांसाठी खाण्याची पाकिटं, रेशन, गरम पाण्याचे फ्लास्क अशी सर्व सोय चेकपॉईंटवर करण्यात आली आहे. ड्युटीवरच राहू इच्छिणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी राहण्याची सोय देखील करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.