Mumbai : ऑस्कर ॲकॅडमीचे कार्यालय मुंबईत स्थापन करण्याबाबत सकारात्मक – जॉन बेली

एमपीसी न्यूज – अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस अँड सायन्सेसची (ऑस्कर ॲवार्डस) ख्याती जगभरात असून ऑस्कर ॲकॅडमीचे कार्यालय मुंबईत स्थापन करण्याबाबत सकारात्मक असल्याचे ऑस्कर ॲकॅडमीचे अध्यक्ष जॉन बेली यांनी सांगितले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झालेल्या पत्रकार परिषदेस ऑस्कर ॲवॉर्डसचे अध्यक्ष जॉन बेली, त्यांच्या पत्नी आणि ऑस्कर ॲकॅडमीच्या गर्व्हनर कॅरल लिटलटन, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, उज्ज्वल निरगुडकर उपस्थित होते.

  • बेली यांनी यावेळी सांगितले की, आज भारतात सर्वाधिक सिनेमांची निर्मिती केली जाते. त्यामुळेच या बॉलिवूड नगरी असलेल्या भारतात पहिल्यांदा येत असताना अत्यंत आनंद होत आहे. ऑस्कर ॲकॅडमीचे सध्या लंडन आणि युरोप येथे कार्यालय आहे. मात्र मुंबईत कार्यालय सुरु केल्यास येथे आशियातले एक केंद्र म्हणून या केंद्राकडे पाहता येईल. त्यामुळे भारतातून परतल्यानंतर आपल्या ऑस्कर ॲकॅडमीच्या बैठकीत मुंबईतील कार्यालयाबाबत आपण प्रस्ताव ठेवू असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आज आंतरराष्‍ट्रीय पातळीवर सिनेमांमध्ये भारतीय सिनेमांचे अस्तित्व अधिकाधिक दिसावे याबाबत आपण सुद्धा आग्रही असल्याचे श्री.बेली यांनी सांगितले. आज वर्षभरात भारतात 1800 सिनेमांची निर्मिती होते, ही संख्या हॉलिवूड सिनेमापेक्षा चार पटीने अधिक आहे. आज भारतीय सिनेमांची कथा,मांडणी आणि सिनेमा बनविण्यासाठी वापरण्यात येत असलेले तंत्रज्ञान यामुळे आपण प्रभावित आहोत. सध्या ॲकॅडमीच्या विविध विभागात 928 सदस्य वेगवेगळया 56 देशातील आहेत. येणाऱ्या काळात ऑस्कर ॲकॅडमीवर भारताचे विविध सिनेमा क्षेत्रातील दिग्गजांनी सहभाग द्यावा जेणेकरुन भारतीय सिनेमा जगभर पोहोचण्यास मदत होईल अशी अपेक्षा बेली यांनी यावेळी व्यक्त केली.

  • पत्रकार परिषदेपूर्वी जॉन बेली आणि कॅरॉल लिटलटन यांनी श्री. तावडे यांची सेवासदन येथे भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत  तावडे यांनी ऑस्कर ॲकॅडमीमध्ये बनत असलेल्या म्युझियममध्ये भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा कांस्य पुतळा असावा अशी मागणी केली. तसेच आज ऑस्कर ॲवॉर्डमध्ये भारतीय चित्रपटसृष्टी अधिकाधिक जोडली जावी अशी मागणी केली.

राज्य मराठी चित्रपट सोहळ्याला बेली दाम्पत्याची विशेष उपस्थिती – विनोद तावडे

56 वा राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा 26 मे रोजी संध्याकाळी 6.30 वाजता वरळी येथील येथील नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय) येथे आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमास ऑस्कर ॲकॅडमीचे अध्यक्ष जॉन बेली प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिली.

  • ऑस्करच्या स्थापनेपासून ऑस्करचे कोणतेही अध्यक्ष यापूर्वी कधीच भारतात आले नव्हते. ऑस्करच्या स्थापनेपासून भारतामध्ये येणारे जॉन बेली हे पहिलेच अध्यक्ष आहेत. ऑस्कर अध्यक्षांना निमंत्रित करुन मराठी चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय गोष्टी त्यांच्या मार्फत जगभरातील सिनेसृष्टीत पोहचविण्याच्या दृष्टीने हा विशेष प्रयत्न करण्यात आला आहे. जॉन बेली यांनी या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहावे यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, सांस्कृतिक सचिव भूषण गगराणी व ऑस्कर अकादमीचे सदस्य उज्ज्वल निरगुडकर यांनी विशेष प्रयत्न केले.

जॉन बेली आणि लिटलटन बेली यांच्याविषयी

जॉन बेली हे गेली २ वर्षे ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष आहेत. ऑस्कर अकादमीच्या सिनेमॅटोग्राफर विभागातून त्यांची ही निवड झाली आहे. कॅलिफोर्निया येथील स्कूल ऑफ सिनेमॅटिक आर्ट येथून त्यांनी पदवी प्राप्त केली.अमेरिकन सोसायटी ऑफ सिनेमॅटोग्राफर्स या जीवनगौरव पुरस्कार श्री. बेली यांना प्राप्त झाला आहे. कॅरॉल लिटलटन या व्यवसायाने फिल्म एडिटर असून त्यांनी ३० हुन अधिक चित्रपटांचे एडिटिंग केले आहे. हॉलिवूडचे सुप्रसिध्द दिग्दर्शक स्टीवन स्पिलूबर्ग यांच्या गाजलेल्या ‘इट इ द एक्सट्रा टेरिस्टेरिअल’ या चित्रपटाचा ही समावेश आहे.

  • राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे यंदाचे ५६ वे वर्ष आहे. चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट पटकथा,सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. याशिवाय व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार, विशेष योगदान पुरस्कार, राज कपूर जीवन गौरव पुरस्कार, राज कपूर विशेष योगदान या सर्वोच्च पुरस्काराचे वितरण सुध्दा होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.