Mumbai : मावळातील गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी भरीव तरतूद करण्याचे आदित्य ठाकरे यांचे आश्वासन

आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

एमपीसी न्यूज- निसर्गसौंदर्यासोबतच मावळमध्ये असलेल्या गड-किल्ले आणि प्राचीन मंदिर, लेण्यांच्या वैभवाला झळाळी प्राप्त करून तालुक्यात पर्यटनाला चालना मिळणार आहे. आमदार सुनील शेळके यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मावळातील गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी भरीव तरतूद करण्याचे आश्वासन दिले आहे.

मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्यासोबत एक बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी याबाबत चर्चा झाली असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली. गडकिल्ल्यांचे पावित्र्य व इतिहास चिरंतन राहिला पाहिजे. दरवर्षी हजारो पर्यटक या किल्ल्यावंर भेट देऊन छत्रपतींच्या शौर्यामधून प्रेरणा घेतात. हा सर्व सांस्कृतिक, ऐतिहासिक ठेवा आपण जपला पाहिजे. येथील सोयीसुविधांमध्ये सुधारणा केल्यास पर्यटन वाढीला चालना मिळू शकेल. या अनुषंगाने विविध व आवश्यक विकासकामांकरिता भरीव निधीची आवश्यकता आहे अशी मागणी आमदार सुनील शेळके यांनी यावेळी केली.

मावळ तालुक्यातील कार्ला येथील एकवीरा देवस्थान, लोहगड-विसापूर, राजमाची किल्ले, भाजे लेणी ही ऐतिहासिक स्थळांवर मूलभूत सुविधांची कमतरता आहे. एकवीरा देवस्थान दर्शनाला जाताना भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, याकडे शेळके यांनी आदित्य ठाकरे यांचे लक्ष वेधले.
आगामी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात येईल, अशी ग्वाही आदित्य ठाकरे यांनी दिली. या निर्णयामुळे मावळ तालुक्यातील पर्यटनामध्ये वाढ होईल अशी आशा आमदार शेळके यांनी व्यक्त केली. या बैठकीला खासदार श्रीरंग बारणे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.