Mumbai Pune Accident : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर कंटेनरने चार वाहनांना चिरडले; पाच जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील फूड मॉल समोर पुण्याहून मुंबईकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने चार वाहनांना जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात 5 जण ठार झाले असून 5 जण जखमी झाले आहेत.

हा अपघात सोमवारी मध्यरात्री 12.50 वाजण्याच्या सुमारास झाला. भरधाव वेगातील कंटेनरने खोपोली फुड मॉल जवळील उतारावर क्रेटा, इनोवा, टेम्पो व ट्रक या चार वाहनांना धडक दिल्याने हा अपघात झाला.

या अपघातात मंजू प्रकाश नाहर (वय 58 रा. इंद्रपुरी, 602, जवाहर नगर, एस.व्ही.रोड, गोरेगाव पश्चिम), डॉ. वैभव वसंत झुंझारे (वय 41), उषा वसंत झुंझारे (वय 63), वैशाली वैभव झुंझारे (वय 38), श्रिया वैभव झुंझारे (वय-5 वर्ष सर्व राहणार ए/1-3,4, अधिकारी वसाहत, नवी मुंबई महानगरपालिका, सेक्टर 15, नेरुळ) यांचा मृत्यू झाला असून स्वप्नील सोनाजी कांबळे (वय 30, रा. गोरेगाव (पश्चिम), प्रकाश हेमराज नाहर (वय 65, रा. गोरेगाव पश्चिम), अर्णव वैभव झुंझारे (वय-11, रा. नेरुळ, नवी मुंबई), किशन चौधरी व काळूराम जमनाजी जाट अशी जखमींची नावे आहेत.

अपघातात वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला असून घटनास्थळी रक्ताचा थारोळा जमा झाला होता. अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस, महामार्ग पोलीस, अपघातग्रस्तांच्या मदतीला या सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते, आयआरबी पेट्रोलिंग ही पथके घटनास्थळी दाखल होत त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले तर गाडीमध्ये आडकलेल्या मृतांना बाहेर काढले तसेच अपघातग्रस्त वाहने बाजुला केली.

या अपघातामुळे बराच काळ मार्गावरील वाहतूक मंदावली होती. डाॅ. वैभव झुंझारे हे नवी मुंबई महानगरपालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी होते. ते आपल्या परिवाराला सोलापुर येथून नवी मुंबईला घेऊन येत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.