Mumbai Rain: मुंबईत 10 तासांत 230 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद; घराबाहेर न पडण्याचा प्रशासनाचा सल्ला

mumbai rain: More than 230 mm of rainfall recorded in 10 hours अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, समुद्रकिनारे तसेच पाणी भरलेल्या ठिकाणापासून लांब राहावे, असे आवाहन मुंबई महापालिकेकडून नागरिकांना करण्यात आले आहे.

एमपीसी न्यूज – मुंबई शहरात सोमवारपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची ‘तुंबई’ झाली आहे. सर्व ठिकाणी पाणी साचल्यामुळे, रस्त्यावरील वाहतूक मंदावली असून मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल सेवाही कोलमडली आहे.

मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मागच्या 10 तासांत मुंबई शहरात 230 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. 26 ठिकाणी पावसाचे पाणी तुंबल्यामुळे एकूण 56 मार्गावर बेस्टने बसेसचे मार्ग बदलले आहेत.

मुसळधार पावसामुळे दादर आणि कुर्ला रेल्वे स्थानक परिसरात पाणी साचले आहे, मेन लाईन आणि हार्बर लोकल वाहतूक बंद आहे.

रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावर लोकल वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. मध्य रेल्वे मार्गावरही लोकल वाहतूक मंदगतीने सुरु आहे.

सततच्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत तसेच, मुंबई वेस्टर्न एक्स्प्रेस वे वर दरड कोसळली आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई शहर व उपनगरात आज मुसळधार पर्जन्यवृष्टीची शक्यता आहे. समुद्रात दुपारी 12.47 च्या सुमारास भरती येणार आहे. अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, समुद्रकिनारे तसेच पाणी भरलेल्या ठिकाणापासून लांब राहावे, असे आवाहन मुंबई महापालिकेकडून नागरिकांना करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.