Mumbai : दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांचे निधन

एमपीसी न्यूज- दलित पँथरचे संस्थापक आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार ज्येष्ठ विचारवंत नेते राजा ढाले यांचे आज, मंगळवारी सकाळी विक्रोळी येथील निवासस्थानी दुःखद निधन झाले. राजा ढाले यांच्या निधनामुळे आंबेडकरी जनतेत तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे.

उद्या बुधवारी (दि. 17) दुपारी 12 वाजता विक्रोळी येथील त्यांच्या निवासस्थानातून अंत्ययात्रा सुरु होईल. त्यांच्या पार्थिवावर दादर चैत्यभूमी मधील विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. आंबेडकरी चळवळ पुढे नेणाऱ्या, बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मानणाऱ्या विचारवंतांमध्ये त्यांची गणना होत होती. दलित पँथरची स्थापना त्यांनी नामदेव ढसाळ आणि अरुण कृष्णाजी कांबळे यांच्या मदतीने केली होती. त्याआधी ते भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या राजा ढाले गटाचे प्रमुख होते.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राजा ढाले यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार; मार्गदर्शक; दलित पँथरचा महानायक हरपला अशा शब्दात त्यांनी राजा ढाले यांना श्रद्धांजली अर्पण केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.