Mumbai: रक्षाबंधनानं दृढ झालं अदिती तटकरे आणि सुनील शेळके यांच्यातील बहीण-भावाचं नातं!

एमपीसी न्यूज – दोघंही पहिल्यांदाच आमदार झालेले, जुन्या-अनुभवी आमदारांच्या गोतावळ्यात दोघेही नवखे, वयानेही एकदम तरुण, नव्या शाळेत, नव्या वर्गात गेल्यासारखी दोघांचीही विधान भवनातील अवस्था आणि त्या गर्दीत दोघांनाही एकमेकांचा आधार वाटला आणि त्यातूनच  दोघांमध्ये निर्माण झाले स्नेहबंध. पुढे हेच आपुलकीचं नातं बहरत गेलं आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने ते बहीण-भावाचं नातं अतूट धाग्यांनी कायमचं बांधलं गेलं. ही गोष्ट आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन उगवत्या ताऱ्यांची अर्थात उद्योग व क्रीडा राज्यमंत्री अदिती तटकरे आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या नात्याची!  

रक्षाबंधनाच्या सणानंतर आमदार सुनील शेळके हे आज (गुरुवारी) प्रथमच मुंबईत गेले होते. त्यांनी नेहमीप्रमाणे आवर्जून अदिती तटकरे यांची भेट घेतली आणि त्यांनीही आवठणीने आपल्या या नव्या भावाला राखी बांधून आजचा दिवस दोघांच्याही आयुष्यात संस्मरणीय केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री सुनील तटकरे खासदार म्हणून दिल्लीच्या राजकारणात गेल्यानंतर त्यांच्या राज्यातील राजकीय वारसदार म्हणून कन्या अदिती तटकरे पुढे आल्या. रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष असणाऱ्या अदिती तटकरे श्रीवर्धन मतदारसंघातून निवडून आल्या. घरात राजकीय वातावरण असले तरी अदिती तटकरे या मुंबईच्या राजकारणात नवख्याच होत्या.

गेली पाच वर्षे विविध सामाजिक उपक्रमांमधून मावळात घराघरापर्यंत पोहचलेले तळेगाव दाभाडेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके नाट्यपूर्ण घडामोडींंवर भरघोस मतांनी मावळचे आमदार म्हणून निवडून आले. या दोन्ही तरुण नेत्यांच्या विजयाची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली.

विधानसभेत कामाच्या निमित्ताने एकत्र आलेले अदिती तटकरे आणि सुनील शेळके जणू जन्मोजन्मीचे बहीण-भाऊ असावेत, अशा प्रकारे एकत्र आले. एकमेकांना मदत करणे, एकमेकांची कामे करणे, अडीअडचणीला धावून जाणे यातून दोघांमधील आत्मीयता वाढत गेली.

दोघांमधील हे स्नेहबंध दिवसागणिक दृढ होत गेले आणि या रक्षाबंधनाला अदिती तटकरे यांनी राखी बांधून ते आपल्या या नव्या भावाला राखीच्या अतूट बंधनात बांधून घेतले.

“ताई नेहमी मी तुझ्या पाठीशी उभा आहे, बहीण-भावाच्या नात्याचे बंध, एकमेकांप्रती आदर दृढ करण्यासाठी सदैव वचनबध्द आहे,” या शब्दांत सुनील शेळके यांनी त्यांच्या या नव्या बहिणीला रक्षाबंधनाची ओवाळणी दिली.

महाराष्ट्राच्या राजकारणात ही बहीण-भावाची जोडी सध्या कौतुकाचा विषय बनली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.