Mumbai: नामवंत अभिनेते इरफान खान यांचे निधन

एमपीसी न्यूज – हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत अभिनेता इरफान खान (वय 54) यांचे आज (बुधवारी) निधन झाले. मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. इरफान खान यांला न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर नावाचा आजार होता. काल अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते, पण त्यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली.

‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘पानसिंग तोमर’, ‘द लंचबॉक्स’, ‘हैदर’, ‘गुंडे’, ‘पिकू’, ‘तलवार’, ‘हिंदी मीडियम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या होत्या. चंद्रकांता, भारत की खोज आदी गाजलेल्या दूरचित्रवाणी मालिकांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. काही इंग्रजी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले होते. अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांच्या अभिनयकौशल्याला गौरविण्यात आले होते.

चित्रपट निर्माते सुजीत सरकार यांनी इरफान खान यांच्या निधनाची माहिती ट्वीट करुन दिली. त्यांनी लिहिलं आहे की, “माझा प्रिय मित्र इरफान, तू लढलास. मला तुझा अभिमान आहे. आपण पुन्हा भेटू. सतुपा आणि बाबिल यांचं सांत्वन.. तुम्ही सुद्धा लढलात. या लढाईत तू शक्य तेवढं केलंस. तुझ्या आत्म्याला शांती मिळो…इरफान खान सलाम.”

इरफान यांनी 16 मार्च 2018 मध्ये आपल्या आजाराविषयी माहिती दिली होती. “मला ‘न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर’ झाल्याचे समजले. सध्या तरी कठीण झाले आहे. पण माझ्यासोबत असलेल्या व्यक्तींचे प्रेम आणि सामर्थ्यामुळे माझ्यात आशेचा किरण निर्माण झाला आहे. मला उपचारांसाठी परदेशात जावे लागणार आहे. मला शुभेच्छा पाठवत राहा, अशी विनंती करतो,” असं इरफान खान यांनी म्हटलं होतं.

त्यानंतर आजारावरील उपचारांसाठी ते परदेशात गेले होते. उपचार पूर्ण झाल्यानंतर दहा महिन्यांनी इरफान खान मायदेशी परतले होते. आपल्या आजारातून सावरत त्यांनी ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटाचे चित्रीकरणही पूर्ण केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.