Mumbai : परप्रांतीय कामगारांची महाराष्ट्रात वापसी सुरू

Return of migrant workers to Maharashtra begins

पोलीस घेताहेत योग्य खबरदारी; गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

एमपीसी न्यूज – लॉकडाउनच्या शिथिलतेनंतर आता राज्यात विविध उद्योगधंदे हळूहळू सुरू झाले आहेत. यासाठी परप्रांतीय कामगार राज्यात परत येत आहेत. त्या सर्व कामगारांची योग्य नोंद, थर्मल तपासणी करण्यात येत आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील परप्रांतीय कामगार वर्ग हा आपआपल्या राज्यात परत गेला होता. तो आता महाराष्ट्रात मोठ्या संख्येने परत येत आहे.

मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, रायगडसह राज्याच्या इतर भागातही दररोज जवळपास 15 हजार 500 हजार कामगार येत आहेत. यात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

या सर्व कामगारांची यादी संबंधित राज्यांकडून आपल्याकडे पाठवण्यात येते. त्या यादीनुसार आलेल्या सर्व कामगारांची नोंद, तसेच त्यांची थर्मल तपासणी करण्यात येते.

त्यानंतर त्यांच्या हातावर होम क्वारंटाईन शिक्का मारून त्यांना राहण्याच्या ठिकाणी होम क्वॉरंटाईनसाठी पाठवण्यात येत आहे. मुंबईमध्ये बेस्टमार्फत पाठवण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

राज्यातील गोंदिया, नंदुरबार, कोल्हापूर, नागपूर, पुणे या ठिकाणी सध्या साधारणतः 4 ते 5 हजार, तर मुंबई ठाणे नवी मुंबई भागात 11 ते साडेअकरा हजार परप्रांतीय कामगार दररोज येत आहेत.

सध्या मर्यादित रेल्वे सुरू असल्याने ही संख्या कमी आहे, पण आपल्याकडील उद्योगधंदे व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यानंतर या संख्येत निश्चितच वाढ होईल.

त्यावेळी देखील योग्य ती खबरदारी घेण्यात येईल, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.