Mumbai : शस्त्राने नव्हे, सेवेने युद्ध जिंकायचे आहे; मुख्यमंत्र्यांचे कोरोना योद्धयांना भावूक पत्र

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कोविड योद्धयांना एक भावूक पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोविड योद्ध्यांचे आभार मानले असून, शस्त्राने नाही तर सेवेने आपल्याला हे युद्ध जिंकायचे आहे, असे आवाहन केले आहे.

या पत्रात मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे की , ‘आपल्या सर्वांना वैयक्तिक स्वरूपात पत्र लिहितांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून माझी छाती अभिमानाने फुलून गेली आहे. हीच आपल्या महाराष्ट्राची आणि मराठी मातीची महान परंपरा आहे. संकटकाळात तो मागे हटत नाही.

सह्याद्रीच्या व्याख्येप्रमाणे कणखर होतो. आज आपण सगळेच कोरोनाच्या भीषण संकटाशी युद्ध करत आहोत. हे युद्ध साधे नाही. या युद्ध संकटात एक ‘सैनिक बनून आपण कोव्हिड योद्धा म्हणून मैदानात उतरला आहात. माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्र रक्षणासाठी सज्ज झाला आहात, हे निश्चितच कौतुकास्पद आहे.

हे युद्ध सुद्धा सीमेवरील सैनिकांप्रमाणेच लढावे लागेल. महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक जणू आज एक सैनिक बनूनच संकटाचा मुकाबला करताना दिसत आहे. आपणासारखे कोव्हिड योद्धे आता युद्धात उतरल्याने मला मुख्यमंत्री म्हणून मोठे बळ मिळाले आहे. ही एक प्रकारे देश आणि देवपुजाच आहे. ही आपली संस्कृती आहे.

शस्त्रापेक्षा ही मोहीम आपल्याला सेवेने जिंकायची आहे. थोडक्यात सेवा हेच आपले शस्त्र राहील. हा महाराष्ट्र, महाराष्ट्रातील जनता आपल्या रक्ताची आणि नात्याचीच आहे. महाराष्ट्राच्या हाकेला प्रतिसाद देत आपण पराक्रमाच्या परंपरेस जपत आहात. आपले आभार कसे मानवेत? ही सेवा महाराष्ट्राच्या व शिवरायांच्या चरणी रुजू झाल्याशिवाय राहणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.

परिचारिका, फार्मासिस्ट, डॉक्टर, सामान्य स्वंयसेवक, सामाजिक कार्यकर्ता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वॉर्ड बॉय, पॅरामेडिक इतर वैद्यकीय व्यावसायिक, माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, शिक्षक, संरक्षण सेवा, सुरक्षा रक्षक, सैन्य वैद्यकीय संस्थेतील लोक अशा विविध क्षेत्रातून मुंबईसह महाराष्ट्रात 21 हजार 752 नागरिकांनी “कोव्हीड योद्धे होण्यासाठी अर्ज केले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.