Mumbai: राज्यात सातव्या कोरोनाबाधिताचा मृत्यू, विदर्भातील पहिला बळी बुलढाण्यात

एमपीसी न्यूज – राज्यात कोरोनाबाधित सातव्या रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. बुलढाणा जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील विलगीकरण (आयसोलेशन) कक्षात शनिवारी मृत्यू झालेल्या रुग्णाचा करोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे करोनाग्रस्ताच्या मृत्यूची पहिली नोंद विदर्भात झाली. मुंबई बाहेरचा राज्यातील हा पहिला कोरोनाचा बळी आहे. 

 

बुलढाणा शहरातीलच एका खासगी रुग्णालयामध्ये गेल्या दोन दिवसांपासून 45 वर्षीय रुग्णावर उपचार सुरू होते. त्यांना निमोनिया झाला होता. सोबतच त्यांना मधुमेहाचाही त्रास होता.

प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना शनिवारी जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यात कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसून आली होती. निमोनिया अधिकच वाढत गेल्याने त्यांची प्रकृती ढासळली. जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केल्यानंतर तासभरातच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.