Mumbai : भाजपला बहुमत सिद्ध करता येणार नाही- शरद पवार

एमपीसी न्यूज- राष्ट्रवादीच्या आमदारांना कोणतीही कल्पना न देता राजभवनात नेण्यात आले असून राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचीत सदस्यांच्या सह्यांचा गैरवापर अजित पवारांनी केल्याची शक्यता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. अजित पवार यांचा निर्णय राष्ट्रवादीच्या विरोधात असून भाजपाला बहुमत सिद्ध करता येणार नाही असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात आज झालेल्या राजकीय घडामोडीनंतर शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला.

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार असं वाटलं असतानाच आज सकाळी महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमय कलाटणी मिळाली. देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. फडणवीस यांच्यासोबत गेलेल्या अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

अजित पवार यांच्या निर्णयावर शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून हा अजित पवार यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचे म्हटले आहे. अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर पक्षांतराची कारवाई जाणार असल्याचे सांगत असतानाच गैरसमजातून कुणी गेलेले असेल तर कारवाई केली जाणार नाही असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करावा, तसा हा फर्जिकल स्ट्राईक शिवरायांच्या महाराष्ट्रावर झाला आहे अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करावा, तसा हा फर्जिकल स्ट्राईक शिवरायांच्या महाराष्ट्रावर झाला आहे अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. आम्ही जे केले ते दिवसाढवळ्या केले. शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले आहे. रात्रीस खेळ चाले असे करून घटनाविरोधी कृत्य केल्याची संतप्त प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. पाठीवर वार केला की काय होते हे दाखवून देऊ असेही ठाकरे म्हणाले.

यावेळी राष्ट्रवादीचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सकाळपासून घडलेल्या घडामोडीचा वृत्तांत सादर केला आम्हाला राजभवनावर नेण्यात आले. पण कशासाठी बोलावण्यात आले याची पुसटशी कल्पना दिली नाही अशी माहिती यावेळी राष्ट्रवादीचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.