Mumbai: राज्यातील 11 हजार कैद्यांना ‘पॅरोल’वर सोडणार – अनिल देशमुख

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या संकटामुळे देशात लॉकडाऊन पाळण्यात येत असताना राज्यातील सुमारे 11 हजार कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतला आहे.

या निर्णयाची माहिती देशमुख यांनी ट्वीटद्वारे दिली आहे. सात वर्षे किंवा त्याहून कमी शिक्षेस पात्र असलेल्या राज्यातील 60 तुरुंगांमधील जवळ-जवळ
11 हजार आरोपी अथवा गुन्हेगारांना तातडीने पॅरोल देण्याचे आदेश दिले आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

पुढील आठवड्याभरात यावर कारवाई व्हावी अशाही सूचना तुरुंग प्रशासनाला दिल्या गेल्या आहेत, असे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

तुरुंगात कैद्याची संख्या कमी करण्यासाठी तसेच तुरुंगात कोरोना संसर्ग होऊ नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

पॅरोल म्हणजे काय?

पॅरोल म्हणजे कैद्याची विशिष्ट मुदतीपुरती केलेली सशर्त मुक्तता. पॅरोल या इंग्रजी संज्ञेचा अर्थ स्थूलमानाने वचन, वाग्विश्वास असा होतो. पॅरोल दॉनर (parole d’Honneur) या फ्रेंच शब्दापासून तो इंग्रजीत रूढ झाला. शिक्षाकाल संपण्यापूर्वी सिद्धदोषीस सशर्त मुक्त करणे, असा फौजदारी कायद्यात पॅरोलचा अर्थ होतो. क्षमा किंवा माफी याहून पॅरोलची कल्पना वेगळी आहे.

गुन्हेगारावरील आरोप सिद्ध होऊन तो कारागृहात पाठविण्याऐवजी न्यायाधीश त्यास काही कालीवधीकरिता परिवीक्षा संमत करून सुधारण्याची संधी देऊ शकतो. गुन्हेगारास संपूर्ण क्षमा करून मुक्त करण्याची शासनाची कृती क्षमेत मोडते. 1840 मध्ये प्रथम अलेक्झांडर मॅकोनोखीने पॅरोल पद्धतीस पूर्व ऑस्ट्रेलियातील नॉरफॉक बेटावरील ब्रिटिश वसाहतीमध्ये सुरुवात केली. त्यानंतर इतर देशांतही निरनिराळ्या प्रकारचे पॅरोल व सशर्त मुक्ततेचे प्रकार रूढ झाले आहेत. 1946 मध्ये नेमलेल्या समितीने केलेल्या शिफारशींनुसार कैदी गंभीर आजारी असेल, त्याच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा वा त्याच्या जवळच्या नातेवाईकाचा मृत्यू झाला असेल, तर कैद्याला पॅरोलवर सोडता येऊ शकते. इतर काही महत्वाच्या कारणांनी कैद्यास पॅरोलवर काही काळ मुक्त करता येते.

पॅरोलकरिता खोटे कारण सांगणाऱ्याला अथवा सवलतीचा गैरफायदा घेणाऱ्याला वा पॅरोलच्या अटींचा भंग करणाऱ्याला शिक्षेची तरतूद केली आहे. स्थानिक महसूल व पोलिस अधिकाऱ्यांतर्फे अर्जांत दाखविलेल्या कारणांची चौकशी करण्यात येते. एक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षा असणाऱ्यास संचित रजा घेण्याचाही अधिकार आहे. कैद्याला फक्त शिक्षा देऊन न थांबता त्याच्यात सुधारणा करून त्याला पुन्हा समाजात मिसळण्याची संधी देणे, हा पॅरोल पद्धतीमागील एक मुख्य हेतू आहे. तुरुंगात असताना कैद्याच्या वर्तनात झालेली सुधारणा व त्याची मानसिक स्थिती लक्षात घेऊन त्याला पॅरोल दिला जातो.

पॅरोलवर सोडण्यात आलेल्या कैद्याने नियुक्त अधिकाऱ्याकडे नियमित हजेरी देणे, ही पद्धत सामान्यतः सर्वत्र प्रचलित आहे. कैद्याने जर पॅरोलच्या शर्तींचा भंग केला, तर त्याचा पॅरोल रद्द होऊ शकतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.