Mumbai: मुख्यमंत्र्यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्याबत राज्यपालांकडे पुन्हा नव्याने शिफारस

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवरील दोन नामनिर्देशित सदस्यांच्या जागांपैकी एका जागेवर नियुक्ती करण्याची शिफारस राज्याच्या मंत्रिमंडळाने आज राज्यपालांकडे पुन्हा एकदा केली. 

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून सहा महिन्यांत विधीमंडळाच्या दोन पैकी कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य होणे घटनेनुसार बंधनकारक आहे. ही मुदत 28 मे रोजी संपत आहे. कोरोना संकटामुळे विधानपरिषदेची निवडणूकही लांबणीवर पडल्याने घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाने मुख्यमंत्र्यांना राज्यपालांच्या कोट्यातून विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्त करण्याचा तोडगा काढला. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यपालांकडे ठाकरे यांच्या नावाची शिफारस करणारा ठराव पारित करून तो राज्यपालांकडे पाठविण्यात आला, मात्र त्याला राज्यपाल कोश्यारी यांनी मान्यता न दिल्याने ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदावरील टांगती तलवार कायम आहे. मंत्रिमंडळाच्या मागील ठरावात काही तांत्रिक त्रुटींबाबत उच्च न्यायालयातही आव्हान दिले गेले. या पार्श्वभूमीवर तांत्रिक त्रुटी दूर करून ठाकरे यांच्या नावाची शिफारस करणारा नवा ठराव मंजूर करून तो राज्यपालांना सादर करण्यात आला.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली व विधान परिषदेच्या दोन रिक्त जागांपैकी एका जागेवर मुख्यमंत्री ठाकरे यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मंत्री मंडळाची शिफारस असलेले पत्र राज्यपालांना दिले. राज्य सरकार सध्या कोरोनाविरोधात लढा देत आहे. आमच्या सर्वांसह संपूर्ण यंत्रणा या लढ्यात सहभागी झाली आहे. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार आज पुन्हा राज्यपालांना विधान परिषदेच्या जागेबाबत मंत्रीमंडळ ठराव पत्र आम्ही सुपूर्द केले, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.