Mumbai : देहविक्री करणाऱ्या 12,500 महिलांना राज्य सरकारचा मदतीचा हात; पुण्यात 2500 महिलांना मिळतेय मदत

महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची माहिती

एमपीसी न्यूज – नाईलाजास्तव देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलांची परिस्थिती सुधारण्यासाठी, त्यांना सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी महिला व बालविकास विभाग प्रयत्न करतो. सध्याच्या ‘कोविड-19’ परिस्थितीत लॉकडाऊनमुळे या महिलांचे उत्पन्न बंद झाल्यामुळे कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी विभागाच्या सर्व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना सूचना देऊन देहविक्री  व्यवसायातील महिलांना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू तसेच व्यक्तिगत स्वच्छता साधने पुरविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आतापर्यंत राज्यातील या व्यवसायातील सुमारे साडेबारा हजार महिलांपर्यंत पोहोचत त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था राज्य शासनाने केली आहे.

पुणे जिल्ह्यात सुमारे 2 हजार 500 महिला देहविक्रय व्यवसायात असून त्यांच्यासाठी काम करणाऱ्या 12 ते 13 संस्थांनी पोलिसांच्या मदतीने त्यांच्यापर्यंत अन्नधान्य, रेशन किट, सॅनिटरी किट पोहोच केले आहे. फरासखाना पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी या मदत कार्यात विशेष भूमिका बजावली आहे. तसेच आरोग्य विभागाकडून नियमित आरोग्य तपासणी केली जात आहे.

बुधवार पेठमध्ये देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या मुलांची संख्या मोठी असून त्यांच्यासाठी शासकीय दूध योजनेतून दुधाचा पुरवठा करण्यात येत आहे. यासाठी कात्रज दूध संघाने मदत केली आहे. ‘सहेली’ संस्थेने येथील महिलांचे मोबाईल रिचार्ज केले असून त्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबाशी संवाद साधता येत असल्याने  मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी त्याची मदत झाली आहे.

मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अहमदनगर या शहरात देहविक्रय व्यवसायातील महिला मोठ्या संख्येने आहेत. या महिलांना रेशनबरोबर सॅनिटायजर्स, सॅनिटरी किट, सोया बिस्किटे व इतर खाद्य वस्तू या वस्त्यांमध्ये पुरविण्यात येत आहेत.अन्नधान्य पुरवठ्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या वतीने मोफत सुलभ शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे.

‘एचआयव्ही’ग्रस्त महिलांसाठी ‘एआरटी’ उपचारपद्धती सुरू असून नियमितपणे औषधे पुरविण्यात येत आहेत. या कामासाठी शासनाबरोबर सामाजिक संस्थांचाही मोठा हातभार लागत आहे. अशी माहिती ठाकुर यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.