Mumbai: परदेशातून आलेल्या नागरिकांच्या क्वारंटाईनबाबत काटेकोर अंमलबजावणी – मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज –  वंदे भारत अभियानांतर्गत परदेशातून महाराष्ट्रात आतापर्यंत 1972 नागरिक आले असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. त्यांच्या क्वारंटाईनची काटेकोर अंमलबजावणी केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

यासंदर्भात अधिक माहिती देतांना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, संपूर्ण शासकीय यंत्रणा कोरोना निर्मुलनासाठी निग्रहाने लढत असतांना माणुसकीच्या नात्याने परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील आणि इतर राज्यांमधील नागरिकांना मुंबईत  आले आहेत. त्यांना क्वारंटाईन करण्याची व्यवस्था राज्य शासनामार्फत करण्यात येत आहे.

वंदे भारत अभियानांतर्गत 10 देशातून 13  फ्लाईट्सद्वारे हे नागरिक महाराष्ट्रात आले आहेत. यात मुंबईतील 822 प्रवासी आहेत.  उर्वरित महाराष्ट्रातील 1025 तर इतर राज्यातील 125 प्रवासी असल्याची माहितीही त्यांनी दिली.  अजून 27 फ्लाईटसने परदेशात अडकलेले नागरिक महाराष्ट्रात येणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.

* इथून आले नागरिक *

आतापर्यंत महाराष्ट्रात लंडनहून 653, सिंगापूरहून 243, मनिलाहून 150, सॅन फ्रान्सिस्कोहून 107, ढाक्याहून 107, न्युयॉर्कहून 208, क्वाललंपुरहून 201,  शिकागोहून 195,  कुवेतहून 2,   आदिस अबबावरून 78, काबूल-12 आणि मस्कत- ओमानहून 16  नागरिक आले आहेत.

* आलेल्या नागरिकांचे संस्थात्मक क्वारंटाईन *

बृहन्मुंबईतील प्रवाशांची संस्थांत्मक क्वारंटाईनची सुविधा हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवासी यांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पाठवण्याची व्यवस्था मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.

जे राज्य त्यांच्या नागरिकास घेण्यास तयार  नाहीत त्यांना मुंबई येथे संस्थात्मक क्वारंटाईनची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. वंदे भारत अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय, केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीरित्या पार पाडत असल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.