Mumbai : कोटा येथे अडकलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी लवकरच घरी परतणार

एमपीसी न्यूज – राजस्थानमधील कोटा शहरात अडकलेल्या जवळजवळ 1800 ते 2000 विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परत आणण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला असून राजस्थान सरकारला याबाबत विनंती केली आहे. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्रालयाचे अभय यावलकर यांनी याबाबत पत्रक काढून माहिती दिली आहे.

राजस्थानमधील कोटा शहरात अभ्यासानिमित्त गेलेल्या जवळजवळ दोन हजार विद्यार्थ्यांना सुखरूप महाराष्ट्रात परत आणण्यात येणार आहे. हे विद्यार्थ्यी मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातून प्रवास करत येणार आहेत. मध्यप्रदेश, राजस्थान, आणि गुजरात सरकारला यासाठी पत्र पाठवण्यात आले असून यासाठी सहकार्य करण्यासाठी सांगितले आहे.

कोटा शहरातून परतणाऱ्या विद्यार्थ्यांची तपासणी केली जाणार आहे. त्यांना चौदा दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागणार आहे. राजस्थानमधील कोटा शहरात विविध परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी देशभरातून विद्यार्थी तिथे जात असतात. कोरोनाच्या संकटामुळे अचानक लाॅकडॉऊन लागू करण्यात आला त्यामुळे हे विद्यार्थी तिथेच अडकून पडले आहेत. त्याठिकाणी पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांची गैरसोय होत होती त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी व तिथे अडकलेल्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात परत आणण्यासाठी सरकारकडे विनंती केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.