Mumbai: विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी शिक्षकांनी समुपदेशन करावे – राज्यपाल

Teachers should counsel students to get out of depression - Governor : Teachers should counsel students to get out of depression - Governor

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत नैराश्याचे वातावरण तयार झाले आहे. विद्यार्थी व युवक यांच्यापुढे आव्हानात्मक परिस्थिती उभी आहे. या परिस्थितीतून युवकांना बाहेर काढण्यासाठी व समाजाला जागरूक करण्यासाठी शिक्षकांना समुपदेशक म्हणून भूमिका पार पाडावी लागेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

देशाला प्रगतीच्या वाटेने पुढे न्यायचे असेल तर ‘घरी राहा, सुरक्षित राहा’ या मानसिकतेतून बाहेर पडून ‘खबरदारी घ्या आणि आनंदी राहून कार्य करा’ (Be Careful and Be Cheerful) हा मूलमंत्र अंगिकारावा लागेल,असेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर मानसशास्त्र विभाग व विद्यार्थी विकास विभागाने महाविद्यालयीन शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या ‘मनोवैज्ञानिक समुपदेशन प्रशिक्षण’ या 7 दिवसांच्या ऑनलाईन कार्यशाळेचे उद्घाटन राज्यपालांनी दृकश्राव्य माध्यमातून आज राजभवन, मुंबई येथून केले. त्यावेळी ते बोलत होते.

नैराश्य किंवा विषाद ही मनुष्यात निर्माण होणारी एक स्वाभाविक प्रवृत्ती आहे. विद्यार्थीच नव्हे तर शिक्षक, शेतकरी आणि राजकारणी यांसह सर्वांना कधी ना कधी निराशा येत असते.

मात्र, ही प्रवृत्ती अभ्यास, निष्ठा व समर्पण भावनेने घालविता येते असे सांगून भगवदगीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला आपल्या मार्गदर्शनाने घोर नैराश्यातून बाहेर काढून कर्तव्य करण्याला प्रवृत्त केले, असे त्यांनी सांगितले.

लोकमान्य टिळकांनी देखील तुरुंगामध्ये राहून निराश न होता गीता रहस्याची निर्मिती केली, याचे स्मरण राज्यपालांनी करून दिले. सोक्रेटस, प्लेटो, कॉनफुशियस, ताओ तसेच संतसाहित्याच्या वाचनाने नैराश्य दूर होण्याला मदत होऊ शकते, असे राज्यपालांनी सांगितले.

भारतातील युवकांना छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, गुरु गोविंदसिंग यांचा थोर वारसा लाभला आहे. त्यामुळे युवकांनी निर्भय होऊन देशाला नवी दिशा देण्यासाठी सज्ज झाले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.

शिक्षकांना समुपदेशक म्हणून मूलभूत प्रशिक्षण देऊन त्यांच्या माध्यमातून महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन केंद्र सुरु करण्याच्या दृष्टीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

उद्घाटन समारोहाला विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, मानसोपचार तज्ञ डॉ सुधीर भावे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.