Mumbai: कोरोनाविरोधातील लढ्यात ‘एक राष्ट्र’ ही भावनाच आपल्याला मोठं यश देईल -देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज – कोरोनाविरोधातील सामूहिक लढ्यात ‘एक राष्ट्र’ ही भावनाच आपल्याला मोठं यश मिळवून देईल, अशी भावना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. ‘हिंदू इकॉनॉमिक फोरम’च्या वतीने ‘कोविडपश्चात काळात ‘भारतीय अर्थव्यवस्था’ या विषयावर फडणवीसांचं व्याख्यान आज (रविवारी) आयोजित करण्यात आलं होतं, यावेळी ते बोलत होते.

कोरोनामुळे सर्वाधिक फटका अमूक एखाद्या क्षेत्राला बसेल, असं समजण्याचं काहीच कारण नाही. सर्वच क्षेत्रांना याचा फटका बसणार आहे. पण, त्याचवेळी अशी संकटं अनेक नवीन संधी सुद्धा निर्माण करत असतात. त्याकडं आपल्याला लक्ष केंद्रीत करावं लागेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

या संकटावर मात करण्यासाठी लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंग हे एकमेव शस्त्र आपल्याकडे उपलब्ध आहे. हे ओळखून आपल्याला या परिस्थितीत जगण्याची सवय आता करून घ्यावी लागेल. गरज ही शोधाची जननी असते. त्यामुळे या परिस्थितीची सवय करीत आर्थिक घडामोडी पुन्हा सुरू करण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण पर्यायांचा शोध प्रत्येकाला घ्यावा लागणार आहे.

यातून अर्थव्यवस्था सुरळीत करण्यात प्रत्येकाला योगदान देण्याची संधी आहे. संघटित आणि असंघटित अशा दोन्ही क्षेत्रात रोजगार सुरक्षित राहतील, याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.