Mumbai : पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा होणार, अन्य वर्गांच्या परीक्षा रद्द -उदय सामंत

Mumbai: The final year examination of the degree will be held, the examinations of other classes will be canceled - Uday Samant

एमपीसी न्यूज – पदवीच्या परीक्षांबाबत उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घोषणा केली आहे. केवळ पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा होणार आहे. जुलै महिन्यात अंतिम वर्षाची, अंतिम सत्राचीच परीक्षा होणार आहे. मात्र, अन्य वर्गांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती उदय सामंत यांनी आज दुपारी ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून दिली आहे.

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन काळात शाळा, महाविद्यालये बंद आहेत. लॉकडाऊनमुळे अनेक शाळा, महाविद्यालयांच्या परीक्षांबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला होता. उदय सामंत म्हणाले, पदवीच्या केवळ अंतीम वर्षाच्या अंतीम सत्राच्या परीक्षा जुलै महिन्यात घेतल्या जाणार आहेत. तर उर्वरित विद्यार्थ्यांना ग्रेडद्वारे गुणदान करत त्याआधारे प्रवेश दिला जाणार आहे.

उदय सामंत यांनी संगितले, जुलै महिन्यात अंतीम वर्षातील अंतीम सत्रातील विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाईल. युजीच्या सीईटी 20 जुलैपर्यंत तर पीजी अभ्यासक्रमाच्या 31 जुलैपर्यंत घेतल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. अन्य वर्षांतील विद्यार्थ्यांना आधीच्या कामगिरीच्या आधारे ग्रेड दिली जाणार आहे.

ग्रेडद्वारे गुणांकन करतांना यापूर्वीची कामगिरीवर पन्नास टक्‍के तर सध्याच्या कामगिरीवर पन्नास टक्‍के असे मुल्यांकन असेल. या ग्रेडच्या आधारे पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. ग्रेडमध्ये कमी गुण मिळाल्याचे मत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठे नंतरच्या काळात परीक्षा घेतली जाणार आहे.

कमी ग्रेड मिळाल्याने अनुत्तीर्ण ठरलेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश दिला जाईल. मात्र, आगामी काळात सध्याच्या वर्गाची परीक्षा द्यावी लागणार. या परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठे त्यांच्या स्तरावर निश्‍चित करणार आहेत. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी जिल्हास्तरावर कौन्सिलिंग सेंटर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या निर्णयानंतर विद्यार्थी वर्गाला दिलासा मिळाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.