Mumbai : खुशखबर; आता उपसरपंचांनाही मिळणार मानधन

The good news; Now the Deputy sarpanch will also get honorarium

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

एमपीसी न्यूज – राज्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचांबरोबर आता उपसरपंचांनाही दर महिन्याला मानधन देण्यात येणार आहे. आतापर्यंत फक्त सरपंचांना मानधन देण्यात येत होते. त्यात उपसरपंचांचा समावेश नव्हता. मात्र, आता सरपंचांप्रमाणे उपसरपंचांनाही मानधन सुरु करण्यात आले आहे.

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबत माहिती दिली. मुश्रीफ म्हणाले की, राज्यातील गावांच्या विकासासाठी सरपंचांबरोबर उपसरपंचांचेही मोठे योगदान असते. सध्या राज्यातील सरपंचांना दरमहा मानधन मिळत आहे.

पण गावाच्या विकासासाठी असलेले उपसरपंचांचे योगदान लक्षात घेऊन त्यांनाही मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, काही तांत्रिक कारणास्तव आतापर्यंत त्यांना मानधन अदा करण्यात आले नव्हते.

आता यासंदर्भातील लेखाशिर्ष तयार करणे, मानधन ऑनलाईन अदा करण्याची कार्यप्रणाली तयार करणे आदी सर्व प्रक्रिया पार पाडून एकूण 8 महिन्यांचे एकत्रित मानधन उपसरपंचांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे.

यासाठी एकूण 15.72 कोटी रुपये उपसरपंचांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहेत.

राज्यात सुमारे 28 हजार ग्रामपंचायती असून त्यातील ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केलेल्या 24 हजार 485 ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांच्या खात्यावर सध्या मानधन जमा झाले आहे.

उर्वरित उपसरपंचांच्या खात्यावर मानधन जमा करण्याची कार्यवाही सुरु असून ती लवकरच पूर्ण केली जाईल, असेही ग्रामविकासमंत्र्यांनी सांगितले.

उपसरपंचांना मिळणार ‘इतके’ मानधन

· 2000 पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांना दरमहा 1000 रुपये

· 2001 ते 8000 पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांना दरमहा 1500 रुपये

· 8001 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांना दरमहा 2000 रुपये

सरपंचांनाही मिळाले प्रलंबित मानधन

दरम्यान, राज्यातील सरपंचांचे मानधन नोव्हेंबर 2019 पासून प्रलंबित राहिले होते. हे मानधन तातडीने अदा करण्यात यावे, अशा सूचना विभागास दिल्या होत्या.

त्यानुसार कार्यवाही करुन विभागामार्फत प्रलंबित मानधनापोटी सरपंचांच्या खात्यावर नुकतेच 22 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.