Mumbai: कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही – मुख्यमंत्री

महाराष्ट्रात मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये साथरोग नियंत्रण रुग्णालये सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. : The second wave of corona will not be allowed to come to Maharashtra - CM

एमपीसी न्यूज – राज्यातील मृत्यू दर कमी करण्याचा प्रयत्न केला जात असून मुंबईतील धारावी, वरळी येथील स्थिती नियंत्रणात आणल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र, अजुनही लढाई संपली नाही. कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही. यासाठी प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

आज प्रधानमंत्री मोदी यांनी महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, पंजाब, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, बिहार आणि उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत कोरोना उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते.

महाराष्ट्रात मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये साथरोग नियंत्रण रुग्णालये सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

कोरोनामुक्त झालेल्या काही रुग्णांना बरे झाल्यानंतरही अन्य आजार झाल्याचे निदर्शनास आले असून कोरोनानंतरच्या उपचाराची व्यवस्था निर्माण होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.

याकाळात शिवभोजन योजनेच्या माध्यमातून महिन्याला लाखो लोकांना केवळ 5 रुपयांमध्ये जेवणाची सोय केली. राज्यातील गरीब जनतेला याचा मोठा लाभ झाला आहे.

मागच्या आठवड्यात कुपोषण निर्मुलनासाठी आदिवासी बालकांना व मातांना दुध भूकटी मोफत देण्याचा निर्णय देखील राज्यशासनाने घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

इमिनॉलॉजी लॅबची संख्या वाढविण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले. विविध प्रकारच्या विषाणूंचा उद्भव कसा आणि का होतो यावर संशोधन करण्याची गरज आहे.

जे उद्या करायचे ते आज आणि आज करायचे ते आत्ता असे उद्याचे जग कोरोनाने आजच दाखवले, असेही त्यांनी सांगितले.

अंतिम वर्षाच्या परिक्षांबाबत देशपातळीवर एकच निर्णय घ्यावा

विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून त्यांचे जीवन धोक्यात घालता कामा नये. त्यामुळे नॉन प्रोफेशनल कोर्सेसच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा घेऊ नयेत, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांनी पुन्हा एकदा प्रधानमंत्र्यांकडे केली. विद्यार्थ्यांना सरासरी मार्क्स देऊन (ॲग्रीगेट) उत्तीर्ण करण्यात यावे.

कोरानामुळे किती काळ असे राहणार याचे उत्तर नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य किती काळ टांगून ठेवणार, यासाठी देशपातळीवर एकच निर्णय लवकरात लवकर घेण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

वैद्यकीय शिक्षणाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षाबाबत निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेनुसार, मौखिक स्वरूपात परीक्षा घेण्याची गरज. अंतिम वर्षाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर कोरोना युद्धात त्यांच्या इच्छेनुसार मदत घेता येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.