Warje – मुंबई – बंगळुरु महामार्गावर ट्रक उलटला

एमपीसी न्यूज – मुंबई बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर वारजे येथील अतुलनगर समोर ट्रक पलटी झाल्याने महामार्गावर प्रचंड वाहतुककोंडी झाली होती. ही घटना  सोमवारी (दि. 28 ) पहाटे 3 च्या सुमारास घडली.

दिलेल्या महितीनुसार, हा ट्रक सूरतहून पार्सल घेऊन बंगळुरूच्या दिशेने निघाला होता. आज पहाटे तीनच्या सुमारास डुक्कर खिंडीच्या पुढे रुणवाल पूलाच्या उतारावर चालकाचे नियंत्रण सुटले. याठिकाणी माई मंगेशकरजवळ नवीन पुलाचे काम सुरु असल्याने अंधारात कठड्याचा अंदाज न आल्याने गाडी त्यावरूनच घसरुन पलटी झाल्याचा अंदाज वाहतूक कर्मचारी व पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. या घटनेनंतर वाहतूक विभागाने वाहतुक वळवण्याचा प्रयत्न केला. परंतु सकाळी सात वाजल्या नंतर मात्र चांदणी चौक व वडगाव या दोन्ही बाजूला वाहतूककोंडी वाढत गेली होती.

भरलेला अवजड ट्रक क्रेनने उचलणे कठीण जात असल्याने  ट्रकमधील पार्सल बाहेर काढून ट्रक मोकळा करण्यात आला. व सकाळी साडे नऊच्या सुमारास ट्रक बाजूला काढण्यात आला. या घटनेमुऴे संपूर्ण वारजे परिसर, महामार्ग व सेवा रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी पाहायला मिळाली. अकरा वाजले तरी परिसरातील वाहतुक सुरळीत झाली नव्हती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.