Mumbai : राज्यात कोरोनाचा तिसरा बळी! आणखी नवीन 15 पॉझिटीव्ह; कोरोनाबाधितांची संख्या 89 वर!

एमपीसी न्यूज – मुंबईत आज एका 68 वर्षीय कोरोनाबाधित पुरुष रुग्णाचा मृत्यू झाल्याने राज्यात कोरोनाच्या बळींची संख्या तीन झाली आहे.  राज्यात काल संध्याकाळपासून 15 जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 89 पर्यंत वाढली आहे. नवीन रुग्णांपैकी 14 मुंबईतील तर एकजण पुण्यातील आहे. 

राज्यातील आतापर्यंतचे कोरोनाचे तिन्ही बळी मुंबईत गेले आहे. तिसरी मृत व्यक्ती फिलिपाइन्सची नागरिक होती. ही व्यक्ती प्रारंभी कोरोना पॉझिटीव्ह होती. उपचारानंतर घेतलेल्या चाचणीचा अहवाल मात्र निगेटीव्ह आला होता. त्यांना मधुमेह व दम्याचाही आजार होता. मूत्र उत्सर्जन बंद पडून तसेच श्वसनाच्या त्रासामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे बृहन्मुंबई महापालिका वैद्यकीय विभागाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

‘जनता कर्फ्यू झाल्यानंतर कोरोना संपला’ या भ्रमात राहू नका. परिस्थिती अजूनही गंभीर असून लोकांनी घराबाहेर पडणे, गर्दी करणे टाळावे, स्वतःची व इतरांची काळजी घ्या, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

राज्यात आढळलेल्या एकूण 89 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 87 रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. दोन रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेतले असले तरी त्यांची प्रकृती चिंताजनक नाही, अशी माहिती टोपे यांनी दिली. राज्यात आतापर्यंत दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत रुग्णांना अन्यही आजार होते, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र दक्षता घ्यावी, असे ते म्हणाले.

कोरोनाचा आतापर्यंतचा संसर्ग व्यक्ती ते व्यक्ती अशाच प्रकारातील आहे. कोरोनाचा सामाजिक (कम्युनिटी) संसर्गाची एकही केस अद्यापि नोंदविली गेलेली नाही, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.

कोरोनाबाधित रुग्णांची शहरनिहाय ताजी आकडेवारी

मुंबई 38

पुणे 16

पिंपरी-चिंचवड 12

नागपूर 4

यवतमाळ 4

कल्याण 4

नवी मुंबई 4

नगर 2

पनवेल 1

ठाणे 1

उल्हासनगर 1

औरंगाबाद 1

रत्नागिरी 1

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.