Mumbai : ‘हा’ मराठी अभिनेता सलमानसोबत ‘राधे’मध्ये साकारणार भूमिका

Mumbai: Marathi actor Praveen Tarde will play the role of 'Radhe' with Salman Khan

एमपीसी न्यूज : ‘अरारारा, खतरनाक’… असं म्हटलं की आपल्याला कोणाची बरं आठवण होते. बरोबर वन अँड ओन्ली प्रवीण तरडे. प्रवीण तरडे यांनी बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता सलमान खानच्या राधे या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.

‘चला हवा येऊ द्या’ मालिकेत नीलेश साबळे त्यांची अगदी हुबेहूब नक्कल करतात. एक मोकळं ढाकळं, रांगडं व्यक्तिमत्व. पण त्यांनी अनेक मराठी मालिकांचे लेखन केले होते हे आपल्याला नंतर कळलं.

अशा या प्रवीण तरडे यांनी ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातून गावातील तरुणांची शोकांतिका समर्थपणे मांडली. त्यातला ओम भुतकरने साकारलेला तरुण अगदी वास्तव वाटला. आजवर गावागावातील तरुणांची हीच शोकांतिका झाली आहे. सध्या प्रवीण ‘सरसेनापती हंबीरराव मोहिते’ या शिवकालीन व्यक्तिमत्वावर चित्रपट तयार करत आहेत.

हंबीररावांची भूमिकादेखील तेच साकारत आहेत. त्याचे चित्रीकरण सुरुच होते, तेवढ्यात कोरोनाचा प्रकोप सुरु झाला. मग प्रवीण सध्या काय करताहेत बरं? तर ते लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. पहिल्याच चित्रपटात ते बॉलिवूडचे भाईजान अर्थात सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करणार आहेत. ‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटात प्रवीण तरडेंनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.

याबद्दल एका मुलाखतीत प्रवीण तरडे म्हणाले, “माझ्या मुळशी पॅटर्न या चित्रपटामुळे सलमान आणि मी संपर्कात आलो. सलमान या चित्रपटाचा हिंदी रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. हा चित्रपट त्याने अनेकदा पाहिला आणि त्यातील माझा अभिनय त्याला खूप आवडला.

म्हणून ‘राधे’ या चित्रपटातील एका भूमिकेसाठी त्यांनी मला विचारलं. मी लगेचच हो म्हटलं. दहा ते १२ दिवस मी शूटिंगसाठी गेलो होतो. सलमानसोबत स्क्रिन शेअर करायला मिळत असल्याने मी फार खूष आहे.”

‘राधे’ या चित्रपटात प्रवीण तरडे मराठी माणसाचीच भूमिका साकारत आहे. ‘सलमानसुद्धा मराठमोळाच आहे. तो मराठी भाषासुद्धा खूप चांगली बोलतो’, असं तरडेंनी सांगितलं.

सलमानने ‘मुळशी पॅटर्न’च्या रिमेकचं नाव ‘धाक’ असं ठेवलं आहे. यामध्ये सलमानचा मेहुणा आयुष शर्मासुद्धा भूमिका साकारणार आहे. आयुषचा पहिला बॉलिवूड चित्रपट फ्लॉप ठरला. म्हणून आता दुसऱ्या चित्रपटात एका वेगळ्याच भूमिकेतून त्याला प्रेक्षकांसमोर आणण्याचा सलमानचा प्रयत्न आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.