Mumbai: दिवंगत राजीव गांधी यांनी रचलेल्या पायावरच आजचा ‘डिजिटल इंडिया’ भक्कमपणे उभा – अजित पवार

Mumbai: Today's 'Digital India' stands firmly on the foundation laid by the late Rajiv Gandhi - Ajit Pawar

एमपीसी न्यूज – दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी हे भारतातील संगणक क्रांतीचे जनक आहेत. देशाने माहिती-तंत्रज्ञान व दूरसंचार क्षेत्रात केलेली प्रगती ही त्यांच्या दूरदृष्टीमुळेच शक्य झाली आहे. आजचा ‘डिजिटल इंडिया’ स्वर्गीय राजीव गांधी यांनी रचलेल्या पायावर भक्कमपणे उभा आहे, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीव गांधी स्मृतीदिनानिमित्त त्यांना अभिवादन करुन आदरांजली वाहिली.

स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृतींना आदरांजली वाहतांना उपमुख्यमंत्री म्हणाले की, राजीव गांधी यांच्या सारखा युवा पंतप्रधान देशाला लाभल्याने युवकांच्या हिताचे अनेक क्रांतीकारी निर्णय घेतले गेले. देशात संगणक युग सुरु करण्याचे श्रेय राजीवजींना आहे. आज कोरोनाच्या संकटात अनेक जण ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत. ‘व्हीसी’द्वारे संवाद साधत आहेत. हे देखील राजीवजींनी त्या काळात घेतलेल्या निर्णयांमुळे शक्य झाले आहे, असे पवार यांनी म्हटले आहे.

वयाची अठरा वर्षे पूर्ण झालेल्या युवकांना मतदानाचा अधिकार देऊन त्यांनी युवकांना निर्णयप्रक्रियेत संधी दिली. सर्वधर्मसमभाव वाढावा, देशात व उपखंडात शांतता नांदावी म्हणून काम केलं. त्यांचा स्मृतीदिन ‘दहशतवादी व हिंसाचारविरोधी दिवस’ म्हणून पाळत असताना वैयक्तिक तसेच सार्वजनिक जीवनातून दहशतवाद, हिंसाचार संपवण्याचा निर्धार करुया, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.