Mumbai : राज्यात दिवसभरात करोना बाधित दोघांचा मृत्यू; राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण रुग्ण संख्या 220

राज्यात 39 करोना बाधित रुग्णांना 'डिस्चार्ज'; आज नवीन 17 रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – राज्यात आज दिवसभरात दोन करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यात एका 78 वर्षीय पुरुषाचा मुंबईतील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला, त्यांना उच्च रक्तदाब आणि हृदयरोग हे इतर आजारही होते तर करोनाबाधित असलेल्या 52 वर्षीय पुरुषाचा पुण्यातील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होता. राज्यातील करोनाबाधित रुग्ण मृत्यूची संख्या आता 10 झाली आहे.

आज राज्यात आणखी १७ कोविड १९ रुग्णांची नोंद झाली त्यामुळे राज्यातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या २२० झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये ८ रुग्ण मुंबईचे आहेत तर ५ रुग्ण पुण्याचे, २ नागपूरचे, तर नाशिक आणि कोल्हापूर येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. याशिवाय मुंबई येथील आणखी काही रुग्णांचे अहवाल अप्राप्त असल्याने त्यांचा अंतर्भाव आजच्या अहवालात करण्यात आलेला नाही.

राज्यात आज एकूण ३२८ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ४५३८ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी ३८७६ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २२० जण पॉझिटिव्ह आले आहेत.

आतापर्यंत ३९ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानं तर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात १९,१६१ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून १२२४ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.

नवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.