Mumbai : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील दोन अधिकारी, सात कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर

एमपीसी न्यूज – पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह राज्यातील 800 जणांना जाहीर झाले आहे. त्यात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील दोन अधिकारी आणि सात कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. याबाबतचे आदेश आज, गुरुवारी (दि. 30) महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला देण्यात आले आहेत.

पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, तसेच आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस उप निरीक्षक रवींद्र राठोड, पोलीस हवालदार धर्मराज आवटे, पोलीस हवालदार प्रभावती गायकवाड, पोलीस हवालदार राजेंद्र शेटे, पोलीस हवालदार अहमद शेख, पोलीस नाईक दिपमाला लोहकरे, पोलीस नाईक दत्तात्रय बनसुडे, पोलीस नाईक संदीप होळकर यांना हे पदक जाहीर झाले आहे. सेवेत सतत 15 वर्ष उत्तम सेवाभिलेख असल्याबाबत हे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे.

महाराष्ट्र पोलीस विभागात विविध प्रकारच्या कर्तव्यामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल पोलिसांना राष्ट्रपतींचे पोलीस पदक, पोलीस पदक, शौर्य पदक अशा विविध पदकांनी गौरविण्यात येते. ही पदके मिळविल्यानंतर राज्याचे महासंचालक देखील बोधचिन्ह / सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देतात.

2019 या वर्षीच्या राष्ट्रपतींचे पोलीस पदक, पोलीस पदक, शौर्य पदक प्राप्त पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांना महाराष्ट्राचे महासंचालक सुबोध कुमार जायसवाल यांनी सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र जाहीर केले आहे.

गुणवत्तापूर्ण सेवा, दरोडेखोर, गुन्हेगारांच्या टोळ्यांविरुद्ध केलेल्या कारवाया, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी केलेली उत्कृष्ठ कामगिरी, नक्षलवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईत उल्लेखनीय कामगिरी, पोलीस सेवेत सतत 15 वर्ष उत्तम सेवाभिलेख, क्लिष्ट आणि बहुचर्चित थरारक गुन्ह्यांची उकल करून खटले कोर्टात दाखल करणे, विशेष शाखेत उत्तम कामगिरी, राष्ट्रीय स्तरावरील खेळात प्राविण्य दाखवणे, प्रशंसनीय स्वरूपाचे अन्य दृश्य व अत्युत्तम काम केल्याबद्दल, जनतेच्या समस्या सोडवून पोलिसांची प्रतिमा उंचावणे, 20 वर्ष विना अपघात उत्तम सेवाभिलेख अशा विविध विभागात हे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.