Mumbai : मध्य रेल्वेची अनोखी वैद्यकीय सेवा; मुंबईहून घेतलेले औषध चिपळूणला पोहोचवले

एमपीसी न्यूज – रेल्वे विभाग नागरिकांची शक्य तेवढी मदत करत आहे. याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. हृदयविकार झालेल्या व्यक्तीला मुंबईहून औषधे आणायची होती. मात्र, लॉकडाऊनमुळे औषधे आणणे शक्य होत नव्हते. त्यात मध्य रेल्वेने या रुग्णाला मदत केली असून मुंबईहून औषध घेऊन ते चिपळूणला पोहोचवले.

मध्य रेल्वेने चिपळूण येथील एका हृदयविकार असलेल्या रुग्णाला अत्यावश्यक औषधे मुंबईहून पाठवायला मदत केली. मध्य रेल्वे पार्सल कार्यालयाने विक्रोळी येथून औषधांचे पार्सल घेतले आणि ओखा-एर्नाकुलम पार्सल ट्रेनवर त्याचे आरक्षण केले.

चिपळूण येथे या गाडीचा निर्धारित थांबा नसतानाही कर्मचार्‍यांनी कोकण रेल्वे अधिकाऱ्यांशी समन्वय साधून पार्सल सोडण्यासाठी थोडा वेळ गाडी थांबवण्याची विनंती केली, त्यानंतर ते चिपळूण स्टेशन मास्टरांकडे सोपवण्यात आले. लॉकडाऊनच्या काळात रेल्वेची केवळ मालवाहतूक सेवा सुरू असून त्याद्वारे देखील रेल्वे विभाग नागरिकांची शक्य तेवढी मदत करत आहे.

अशाच एका दुसर्‍या घटनेत मध्य रेल्वेने राजस्थानमधील फालना येथून सिकंदराबाद पर्यंत उंटांचे दूध न्यायला मदत केली, विशेष उपचार सुरु असलेल्या मुलासाठी या दुधाची गरज होती.

देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान प्रवासी वाहतूक बंद असताना पार्सल आणि मालगाड्या चालवल्या जात असून देशभरात अन्नधान्य, नाशवंत खाद्यपदार्थ, औषधे इत्यादींची वाहतूक केली जात आहे. एकट्या मध्य रेल्वेने लॉकडाऊन दरम्यान 283 टन वैद्यकीय सामुग्रीची वाहतूक केली आहे.

तसेच वेळापत्रकानुसार 180 पार्सल गाड्या चालवल्या आहेत आणि आणखी 40 नियोजित आहेत. कोरोना विषाणूविरूद्ध भारताच्या लढ्यात मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ आणि नागपूर विभागांनी अथक काम केले आहे.

मध्य रेल्वेचे इतर युनिट्सही आपले योगदान देण्यासाठी पुढे सरसावले आहेत. परेल आणि माटुंगा रेल्वे वर्कशॉपने रेल्वे कर्मचारी आणि इतर आघाडीच्या कामगारांच्या वापरासाठी 13 हजार पेक्षा अधिक मास्क आणि 1 हजार 600 लिटर सॅनिटायझर्स तयार केले आहेत. शंभर वर्षांहून अधिक जुने कल्याण रेल्वे स्कूल मास्क आणि सॅनिटायझर्स तयार करण्यात स्वेच्छेने सहभागी झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.