Mumbai : ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांचे निधन

एमपीसी न्यूज- श्रवणीय, अजरामर व अवीट गोडीच्या संगीतामधून श्रोत्यांच्या मनात घर केलेले ज्येष्ठ संगीतकार मोहम्मद जहूर खय्याम (वय ९२) यांचे सोमवारी रात्री मुंबईत खासगी रुग्णालयात निधन झाले. खय्याम यांच्या निधनाने वेगळ्या धाटणीचे संगीत देणारा कलाकार हरपला आहे. त्यांच्या पार्थिवावर आज मुंबईतील चार बंगला येथील कब्रस्तानात दफनविधी करण्यात येणार आहे.

कभी-कभी, उमराव जान, नुरी, रझिया सुलतान, बाजार चित्रपटामधील त्यांची सदाबहार गाणी आजही रसिकांच्या हृदयात घर करून आहेत. पद्मभूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले असून 2010 मध्ये खय्याम यांना संगीतक्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी ‘फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

आपल्या संगीत क्षेत्रातील करीयरची सुरुवात त्यांनी वयाच्या सतराव्या वर्षी लुधियाना येथे 1943 च्या सुमारास केली. 1948 च्या सुमारास खय्याम यांनी लोकप्रिय चित्रपट ‘हीर रांझा’साठी संगीत दिग्दर्शन केले. अभिनेता बनण्यासाठी मुंबईत आलेल्या खय्याम यांनी संगीतकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख बनवली. सामाजिक बांधिकली जपत त्यांनी वयाच्या 90 व्या वर्षी आपली 10 कोटींची संपूर्ण संपत्ती दान केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.