Mumbai : ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे निधन

एमपीसी न्यूज- शोले चित्रपटातील ‘कालिया’च्या भूमिकेमधून चित्रपट रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे (वय 78) यांचे मुंबईतील गावदेवी येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. तब्येत खालावल्याने त्यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल केले होते. विजू खोटे यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अभिनेते विजय खोटे यांनी आपल्या चतुरस्त्र अभिनयाने हिंदी-मराठी सिनेमासृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. मराठी रंगभूमीबरोबर त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटात दमदार भूमिका केल्या. शोले सिनेमातील त्यांची कालियाची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. विजू खोटे यांनी तीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी असंख्य छोट्या भूमिका केल्या मात्र अभिनय कौशल्य आणि अप्रतिम संवादफेकीमधून खोटे यांनी सर्व भूमिका अजरामर केल्या. ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे या त्यांच्या भगिनी होत. विजू खोटे यांचे वडील नंदू खोटे हे देखील जुन्या काळातील अभिनेते होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.