Mumbai : कोरोना विरुद्धचे युद्ध आपण मनोबल, जिद्दीच्या जोरावर नक्कीच जिंकू -उद्धव ठाकरे

एमपीसी न्यूज – भारत हे कोरोना विरुध्दचे युद्ध नक्कीच जिंकेल आणि हे युद्ध जिंकण्यासाठी त्यांना त्यांचे मनोबल, जिद्द आणि संयम मदत करेल, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (रविवारी) जनतेशी संवाद साधताना व्यक्त केले. महाराष्ट्रात पुरेशा चाचण्या होत आहेत व शक्य ती सर्व उपायोजना केली जात असून हळूहळू आपल्याला जनजीवन पूर्वपदावर ते आणायचे आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आपल्या मनोगतात उद्धव ठाकरे यांनी सर्व धर्मीय यांचे आभार मानले व रमजानच्या आणी अक्षय तृतीयाचे सर्व बांधवांना शुभेच्छा दिल्या. तसेच महाराष्ट्रातील लोक ज्या पद्धतीचा संयम दाखवत आहेत त्याच संयमाच्या जोरावर आपण ही लढाई जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या संकटाच्या वेळेला देव देवळात नसून तो पोलीस, डॉक्टर सफाई कर्मचारी यांच्या रूपाने कोरोनाचा सामना करण्यात अग्रस्थानी राहून मेहनत घेत आहे. दरम्यान, कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या दोन पोलीस कॉन्स्टेबलना उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, कोरोनाच्या गुणाकाराचा दर आपण निश्चित कमी केला असून तो आपल्याला अजून कमी करायचा आहे. महाराष्ट्रातील परिस्थितीवर केंद्राचे पथक लक्ष ठेवून आहे व गेल्या एक आठवड्यापासून महाराष्ट्रातच तळ ठोकून आहे. कोरोनाची रुग्णसंख्या जास्त असलेल्या ठिकाणी हॉटस्पॉट व कंटेनमेंट झोन करून आपण योग्य खबरदारी घेत आहोत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत एक लाखाच्या पुढे चाचण्या झाल्या झाल्या आहेत.
महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या जास्त असली तरी या रुग्णातील 80% रुग्ण हे लक्षणे विरहीत असून ही बाब समाधानकारक आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे उद्धव ठाकरे यांनी विशेष आभार मानले. या अडचणीच्या काळात राजकारणाचे डमरू वाजवणार्या नेत्यांचे कान टोचल्याबद्दल त्यांनी गडकरी यांना धन्यवाद दिला. राजस्थान मधील कोटा शहरात अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

शेतीच्या कामासाठी यापूर्वीही कोणती बंधने नव्हती व ती यानंतरही राहणार नाहीत, तसेच कापूस खरेदी केंद्र सुरू केली आहेत व फळ वाहतुकीला सुद्धा कोणती बंदी राहणार नाही असे, उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

इतर रुग्णांचे हाल होत असल्यामुळे खासगी दवाखाने सुरू करावे, विशेष करून डायलेसिस सेंटर व फिव्हर क्लिनिक सुरू करण्यात यावीत अशी उद्धव ठाकरे यांनी खासगी डाॅक्टरांना विनंती केली. 3 मे नंतरच्या निर्णयाबद्दल अजून कोणताही विचार झाला नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबर सोमवारी (दि.27) रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आपण हे युद्ध जिंकणारच आहोत पण आपल्याला संयम राखावा लागेल, जिद्द आणि मनोबलाच्या जोरावर आपण हे युद्ध नक्कीच जिंकू असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.