Mumbai : ‘वॉचमॅन’चा ‘सुपरस्टार’ कसा झाला हे पाहून तुम्हीही व्हाल थक्क

एमपीसीन्यूज ; शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे मराठी माणसाचे दैवत. त्यांच्या जीवनावर आधारित  चित्रपटात एका हिंदी भाषिक अभिनेत्याने बाळासाहेब साकारले होते. सुरुवातीला प्रेक्षकांना ते खटकलं. पण जेव्हा तो पिक्चर रिलिज झाला आणि त्या अभिनेत्याचा जिवंत अभिनय लोकांनी पाहिला तेव्हा हा अभिनेता का ? अशी कुठलीही भावना लोकांच्या मनात उरली नाही. इतक्या समरसतेने त्याने बाळासाहेब साकारले होते. तो अभिनेता म्हणज नवाजुद्दीन सिद्दिकी. आज नवाजुद्दीनचा वाढदिवस. त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

नवाजुद्दीनचा जन्म उत्तर प्रदेशमधील बुढाना येथे झाला. एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या या मुलाने आयुष्यात प्रचंड मेहनत केली आहे. अभिनेता होण्यापूर्वी नवाजुद्दीने अनेक लहानमोठ्या नोक-या केल्या. तो कधी केमिस्ट होता तर कधी चक्क वॉचमॅनचीही नोकरी त्यानं केली.

नंतर तो नोकरीसाठी दिल्लीत आला असताना त्याने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा जॉईन केलं. तेथील शिक्षण पूर्ण झाल्यावर नवाजुद्दीन मुंबईत आला. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी नवाजुद्दीनला बराच संघर्ष करावा लागला.  १९९९ मध्ये त्याने आमिर खानच्या ‘सरफरोश’ या चित्रपटात एक छोटेखानी भूमिका साकारली. आमिरचा हा चित्रपट सुपरहिट ठरला. परंतु नवाजुद्दीनला त्याचा फायदा झाला नाही.

_MPC_DIR_MPU_II

त्यानंतर त्याने ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटात  चोराची भूमिका साकारली होती. तसंच अनुराग कश्यपच्या ‘डेव डी’मध्ये एका गाण्यात झळकला. इतकंच नाही तर दिवगंत अभिनेता इरफान खानच्या ‘पान सिंह तोमर’ या चित्रपटातही त्याने छोटेखानी भूमिका केली. नवाजुद्दीने त्याच्या करिअरमध्ये जवळपास १२ वर्ष छोटेखानी भूमिकाच साकारल्या.

मात्र २०१२ मध्ये ‘गँग्स ऑफ वासेपुर’ या चित्रपटातील फैजल खानने त्याला यश दिले. मग मात्र त्याची गाडी सुसाट सुटली.  नंतर  त्याने  ‘मंटो’, ‘ठाकरे’ या सारख्या चित्रपटांमधून उत्तम अभिनय करुन स्वत:ला सिद्ध केले.  ‘तलाश’, ‘द लंच बॉक्स’, ‘किक’, ‘बदलापूर’, ‘बजरंगी भाईजान’, ‘रईस’, ‘मुन्ना मायकल’, ‘हाऊसफुल 4’, ‘मोतीचूर चकनाचूर’ या सारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्याने काम केलं. नंतर आलेल्या  ‘सेक्रेड गेम्स’या वेबसिरिजने त्याला आणखी लोकमान्यता मिळवून दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.