Mumbai: खूशखबर! गावी जाण्यासाठी सोमवारपासून लालपरी मोफत धावणार – अनिल परब

कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांना प्रवासाची मुभा नाही

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनमुळे राज्यातील विविध भागांमध्ये अडकून पडलेल्या मजूर, कामगार, विद्यार्थी, भाविक, यात्रेकरू यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी राज्य शासनाने सशर्त एसटीने मोफत बस प्रवास सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांना कोणत्याही प्रवासाची मुभा देण्यात येणार नसल्याची माहिती परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांनी दिली.

ज्या नागरिकांना प्रवास करायचा आहे त्यांनी आपल्या हद्दीतील पोलिस आयुक्तालय कार्यालयातील संबंधित नोडल ऑफिसर म्हणजे परिमंडळाचे पोलीस उपायुक्त यांचे अनुमती पत्र व इतर ठिकाणी नोडल ऑफिसर म्हणून जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्या अनुमतीचे पत्र घेणे आवश्यक आहे.

तसेच अशा अनुमती प्राप्त नागरिकांचे 22 जणांचे गट करून संबंधित नोडल ऑफिसरमार्फत प्रवास करणाऱ्यांची यादी एसटीच्या जिल्हा स्तरावरील विभाग नियंत्रकाकडे दिली जाईल. त्यानुसार सदर नागरिकांना महामंडळामार्फत एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात येतील आणि नोडल ऑफिसरमार्फत अनुमती प्राप्त नागरिकांना एसटी बसेसने त्यांच्या जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी सुखरूप पोहचविले जाईल.

ज्या नागरिकांना व्यक्तिगत पातळीवर प्रवास करावयाचा आहे त्यांनी नोडल ऑफिसरकडून ऑनलाईन अर्ज करून अनुमतीपत्र प्राप्त करून घ्यावे. सदर पत्र प्राप्त झालेल्यांसाठी सोमवारपासून एसटीचे नवीन पोर्टल सुरू होत आहे. त्यांनी तेथे आपल्या प्रवासाची नोंद करावी. त्यांच्या प्रवास ठिकाणानुसार त्यांचे 22 – 22 जणांचे गट करून त्यांना एसटी बसेसची व्यवस्था करून देण्यात येईल.

प्रवासासाठी वापरण्यात येणाऱ्या बसेस पूर्णपणे निर्जंतुक केलेल्या असतील तसेच संपूर्ण प्रवासात सोशल डिस्टसिंगच्या सर्व नियमांचे पालन करण्यात येणार असल्याचे परब यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.