Mumbai: राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्षांना पत्र; शपथेबाबत केली ‘ही’ मागणी

Governor Bhagat Singh Koshyari's letter to Vice President, Speaker of Lok Sabha; demand made for the oath : मंत्री, सदस्य यांना शपथ घेण्याबाबत ‘मार्गदर्शक तत्वे’ ठरवून देण्याची मागणी

एमपीसी न्यूज – नव्याने निवडून आलेले काही संसदसदस्य तसेच विधानमंडळ सदस्य शपथ घेताना निर्धारित प्रारुपातील शपथ न घेता त्यामध्ये आपल्या पक्षाचे नेते तसेच आदर्श व्यक्तींची नावे जोडून शपथ घेत असल्याचे नमूद करतात. त्यामुळे या संदर्भात सर्व संबंधिताकरिता निश्चित अशी मार्गदर्शक तत्वे, आचारसंहिता ठरवून देण्याची विनंती महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली आहे.

याबाबत उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू व लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना स्वतंत्र पत्र पाठवून राज्यपालांनी शपथ ग्रहण विधीचे पावित्र्य व गांभीर्य जतन करण्यासाठी अशा प्रकारच्या मार्गदर्शक तत्वांची गरज असल्याचे नमूद केले आहे.

आपल्या आवडत्या पक्ष नेत्यांचे अथवा आपली श्रद्धा व निष्ठा असलेल्या आराध्य व आदर्श व्यक्तींचे नाव शपथेच्या प्रारूपामध्ये जोडल्यामुळे शपथ विधी प्रक्रियेचे गांभीर्य कमी होते, असे कोश्यारी यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

महाराष्ट्रात मंत्री पदाची शपथ देताना काही सदस्यांना आपण शपथ लिहिली आहे त्याच स्वरुपात कुठलीही नावे न जोडता पुन्हा वाचण्याची सूचना केली होती. याचे राज्यपालांनी आपल्या पत्रात स्मरण केले आहे.

शपथेच्या प्रारूपापासून फारकत घेण्यासंदर्भातील या विषयावर आपल्या स्तरावर विचार विनिमय करून सर्व संबंधिताना योग्य सूचना / मार्गदर्शक तत्वे देऊन शपथ विधी प्रक्रियेचे पावित्र्य जतन करण्याची विनंती राज्यपालांनी आपल्या पत्राद्वारे उभय पीठासीन अधिकाऱ्यांना केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.