Mumbai : महाराष्ट्राचे साहित्य रत्न निखळले – मुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री यांच्यासह इतर मंत्र्यांनी ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी यांना वाहिली श्रद्धांजली

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राच्या साहित्य विश्वातील अमूल्य असे साहित्य ‘रत्न’ निखळले अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, रत्नाकर मतकरी गेल्याची बातमी मनाला खूप वेदना देऊन जाणारी आहे. ते साहित्य विश्वातले अमूल्य असे रत्न होते. त्यांनी त्यांच्या साहित्यातून, नाटकांमधून लहान मुलांना, मोठ्यांना निखळ आनंद दिला.

आमच्या पिढीतल्या लहानांचे भावविश्व साकारले, महाराष्ट्राचे साहित्य- नाट्य क्षेत्र समृद्ध केले. एकीकडे अनेक मानाचे पुरस्कार मिळत असतानाही रत्नाकर मतकरी हे रसिकांना निखळ आनंद देण्यासाठी सच्चेपणाने नवनवीन साहित्य निर्मिती करत राहिले. त्यांचे निधन निश्चितपणे धक्का देणारे आहे. महाराष्ट्राचे अमूल्य साहित्य’रत्न’ निखळले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. महाराष्ट्राचं सांस्कृतिक विश्व समृद्ध करणारं महान व्यक्तिमत्व हरपलं असून साहित्यिक, रंगभूमी, सांस्कृतिक क्षेत्रातलं रत्नाकर मतकरी यांचं योगदान चिरंतन राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी, महाराष्ट्राने एक बहुआयामी ‘रत्न’ गमावले आहे. त्यांच्या निधनाने साहित्य आणि रंगभूमी या क्षेत्रात न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे, या शब्दात आपली भावना व्यक्त केली.

बाल नाट्य ते भयकथा असा विस्तृत पट आपल्या लेखणीतून साकारणारे ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, दिग्दर्शक,चित्रकार, आस्वादक, विज्ञानवादी रत्नाकर मतकरी यांच्या निधनामुळे, एका चतुरस्त्र व्यक्तिमत्वाला महाराष्ट्र मुकला आहे, अशा शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.