Pimpri: आमदारांच्या शिफारसी डावलून मुंडेसमर्थक खाडे यांना मिळाला न्याय!

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी लागली वर्णी 

(गणेश यादव)

एमपीसी न्यूज –  शहराचे कारभारी असलेल्या आमदारांच्या शिफारसी डावलून भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्याला न्याय मिळाला आहे. माजी उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक सदाशिव खाडे यांची पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदीपदी वर्णी लागली आहे. खाडे यांच्या नियुक्तीमुळे भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.  निष्ठावान गटाने या निवडीचे जोरदार स्वागत करत फटाक्यांचे बार उडविले आहेत. तर, भाजप नेतृत्वाने आमदारांच्या शिफारशी डावलून त्यांना ‘जोर का झटका’ दिला असल्याची, जोरदार चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

राज्यामध्ये भाजपचे सरकार आल्यानंतर  पिंपरी-चिंचवड शहरातील निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा सर्वांना होती. त्यानुसार अमर साबळे यांना राज्यसभेची लॉटरी लागली. त्यानंतर  भाजपचे जुने कार्यकर्ते अॅड. सचिन पटवर्धन यांची राज्य लेखा समितीच्या अध्यक्षपदी वर्णी लागली होती. नुकतेच तीन वर्ष पुर्ण झाल्यानंतर पटवर्धन यांची फेरनियुक्ती देखील करण्यात आली आहे. परंतु, पटवर्धन यांच्यानंतर आजपर्यंत एकाही निष्ठावानाला मोठे पद मिळाले नव्हते. अनेक दिवसांपासून पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी खाडे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु होती. तथापि, विविध कारणांमुळे त्यांचे नाव मागे पडत होते.

फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका निवडीवेळी अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांना उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे निष्ठावान गटाने उपोषाणास्त्र उगारले होते. त्यानंतर पालिकेच्या स्वीकृत नगरसेवक निवडीवेळी निष्ठावान गटाने पक्षात नवीन आलेल्यांवर बाजी मारली. भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणा-या अॅ. मोरेश्वर शेडगे आणि माऊली थोरात यांची स्वीकृत नगरसेवपदी वर्णी लागली होती. त्यावेळी कारभा-यांच्या शिफारसी डावलून पक्ष नेतृत्वाने निष्ठावान गटाला न्याय दिला होता.

माजी उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे पिंपरी-चिंचवडमधील कट्टर समर्थक सदाशिव खाडे यांचे नाव प्राधिकरणाच्या अध्यक्षपदासाठी जानेवारी 2018 मध्ये निश्चित झाले होते. परंतु, त्याला शहराचे कारभारी असलेल्या नेत्यांनी विरोध दर्शविल्याने नियुक्ती लांबणीवर पडली होती, अशी चर्चा भाजपच्या वर्तुळात सुरु होती. कारभारी असलेल्या आमदारांनी प्राधिकरणाच्या अध्यक्षपदासाठी आपल्या समर्थकांच्या नावांच्या शिफारशी केल्या होत्या, असे बोलले जात आहे. पक्षनेतृत्वाने आमदारांच्या शिफारसी डावलून पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते असलेल्या सदाशिव खाडे यांची पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदीपदी नियुक्ती केली आहे. खाडे यांच्या नियुक्तीमुळे भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

खाडे हे व्यावसायाने शिक्षक असून भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. माजी उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून खाडे  ओळखले जातात. त्यांनी पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे अध्यक्षपद देखील स्वीकारले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली 2014 ची मावळ लोकसभा आणि तीनही विधानसभा मतदार संघाच्या निवडणुका लढविल्या होत्या. खाडे यांच्या माध्यमातून 13 वर्षानंतर प्राधिकरणाला अध्यक्ष मिळाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.