Mundhwa Crime News : ‘लिव्ह-इन-रिलेशन’मधून जन्मलेल्या चिमुरड्याचा खून, अडीच वर्षांनंतर घटनेचा उलगडा

एमपीसी न्यूज – ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मधून जन्मलेल्या बाळाला अनाथाश्रमात ठेवण्याच्या निमित्ताने घेऊन जाण्याचा बहाणा करत त्याचा खून केल्याचा प्रकार तब्बल अडीच वर्षांनी उघडकीस आला. मुंढवा पोलिसांनी या प्रकरणी बाळाचा बाप आणि त्याच्या एका सहकार्‍यास अटक केली आहे. शुभम महेश भांडे (वय 23) आणि त्याचा मित्र योगेश सुरेश काळे (वय 26) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी एका 25 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी शुभम आणि फिर्यादी तरुणी 2017 साली एकाच कंपनीत काम करत होते. दरम्यान, त्या दोघांत ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. यातून फिर्यादीला गर्भधारणा झाली. फिर्यादीने आरोपी शुभम याला याची माहिती दिल्यानंतर मी तुझ्या सोबत लग्न करणार आहे असे सांगून फिर्यादी सोबत स्वतःचे पती म्हणून नाव लावले आणि तिला ससून रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर फिर्यादीने 14 मार्च 2019 रोजी एका बाळाला जन्म दिला.

दरम्यान, या बाळाला केशवनगर मुंढवा येथील घरी आणल्यानंतर फिर्यादी तरुणीने शुभमला याबाबत घरी सांगण्यासाठी सांगितले. परंतु इतक्यात घरचे आपल्याला स्वीकारणार नाहीत असे सांगून शुभमने बाळाला तात्पुरते आश्रमात ठेवतो असे सांगितले. याबाबत फिर्यादीचा विरोध असतानाही हा विरोध झुगारून त्याने मित्र योगेश काळे याच्याशी संगनमत करून 27 मार्च 2019 रोजी ते बाळाला घेऊन गेले आणि घरी येऊन बाळाला आश्रमात दिले असल्याचे सांगितले.

या घटनेनंतर फिर्यादीने अनेकदा शुभमकडे बाळाविषयी विचारणा केली असता त्याने आतापर्यंत उडवाउडवीची उत्तरे दिली. काही दिवसांनी आरोपी शुभम याने पीडित मुलीसोबत लग्न करण्यास नकार दिला. दरम्यान त्याचवेळी दुसऱ्याच एका मुलीसोबत शुभमचा विवाह ठरला होता. त्यांचा साखरपुडाही झाला होता. याची माहिती पीडित मुलीला समजल्यानंतर तिने आधीच या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करीत आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडे चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मुंढवा पोलिसांनी आरोपींना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.