Pune News : कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना सोडले वाऱ्यावर !

एमपीसी न्यूज : गेल्या आठ महिन्यांत कोरोनामुळे पुणे महापालिकेतील 50 हून जास्त कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्या कर्मचाऱ्यांपैकी कंत्राटी पद्धतीवर कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्यांची कुटुंबे अजूनही आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. घोषणेनंतरही महापालिका प्रशासनाकडून आजपर्यंत एकाही कोविडयोद्धा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिलेली नाही.

दरम्यान, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी रात्रंदिवस राबत होते. गत काही महिन्यांपुर्वी कोरोनाच्या काळात कामावर असताना संसर्ग होऊन मरण पावलेल्या प्रत्येक कोविडयोद्धयांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये आर्थिक मदत किंवा 25 लाख रुपये मदत आणि घरातील एका व्यक्तीला पालिकेत नोकरी देण्याची घोषणा केली होती

पालिकेने कोरोना नियंत्रणाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मृत्यूमखी पडल्यास त्यांच्या वारसांना 1 कोटी रुपये मदत देण्याची घोषणा केली. त्यात, 50 लाख पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचा विमा, 25 लाख महापालिका तसेच 25 लाख राज्य शासनाची मदत अशी ही मदत होती. या गेल्या आठ महिन्यांत 50 हून जास्त कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर पालिकेने केंद्राने नेमलेल्या विमा कंपनीस प्रस्ताव पाठविला. मात्र, हे कर्मचारी थेट कोरोना रुग्णाच्या उपचाराचे काम करत नव्हते असे सांगत, विमा कंपनीने ही मदत नाकारली होती.

त्यानंतर स्थायी समितीकडून केवळ 44 जे पुणे महापालिकेच्या सरळ सेवा भरती प्रक्रियेतून कायमस्वरुपी काम करत होते. त्यांनाच प्रत्येकी 25 लाखांची मदत देण्याला मान्यता दिली गेली. मात्र, कंत्राटी पद्धतीवर कार्यरत पण कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकाचेही धनादेश काढलेले नाहीत.

कोरोनाची लस आली तरी अद्यापही आम्हाला जाहीर केलेली मदत अजूनही मिळाली नाही. केवळ आमचे कुटुंबप्रमुख कंत्राटी पद्धतीवर होतो म्हणून भेदभाव का केला जात आहे, अशा संतप्त शब्दात कोरोना प्रतिबंधाचे काम करताना मृत्युमुखी पडलेल्या पालिका कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्‍त केला जात आहे. मयत कर्मचाऱ्यांच्या मृत्यूचे राजकीय भांडवल न करता, कायम आण कंत्राटी असा भेद न करता तातडीने मदत द्यावी, अशी विनवणी पीडित कुटुंबिय करत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.