Pune : सुरक्षा रक्षकांच्या विविध प्रश्नांवरून महापालिका प्रशासनाची बोलती बंद; भ्रष्टाचार होत असल्याचा काँग्रेस नगरसेवक अविनाश बागवे यांचा गंभीर आरोप

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका सुरक्षा रक्षकांच्या विविध प्रश्नांवरून महापालिका प्रशासनाची बोलती बंद झाली. ठेकेदार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करीत असल्याचा गंभीर आरोप काँगेस नगरसेवक अविनाश बागवे यांनी केला. महापालिका सर्वसाधारण सभेत त्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. त्यावर सुरक्षा विभागाचे प्रमुख माधव जगताप यांना समाधानकारक उत्तरे देण्यात आली नाही. त्यामुळे आयुक्तांच्या देखरेखीखाली चौकशी करण्यात यावी. जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. आणि संबंधित ठेकेदाराला ‘ब्लॅक लिस्ट’ करण्यात यावे, असे स्पष्ट आदेश प्रभारी महापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी दिले. त्या संबंधीचा अहवाल ठेवण्यासही सांगण्यात आले. पण, असे अनेक अहवाल ठेवून कारवाई होत नसल्याचे बागवे म्हणाले.

सुरक्षा रक्षकांना देण्यात येणारा पगार हा सर्वसामान्य पुणेकरांच्या खिशातून देण्यात येतो. नेमके किती सुरक्षा रक्षक आहेत, ठेकेदार रेलिव्हर ठेवतच नाही, तो पैसा कोणाच्या खिशात जातो, त्यांचा पीएफ जमा होतो का? नेमका किती पगार दिला जातो, किती कट होतो, असे अनेक सवालही बागवे यांनी उपस्थित केले. तर, गणवेश ठेकेदार देत असून, 150 रेलिव्हर असल्याचे माधव जगताप म्हणाले.

ठेकेदाराला महिन्याला तब्बल 58 लाख रुपये मिळत असल्याचे काँगेसचे गटनेते अरविंद शिंदे म्हणाले. यामध्ये काही तरी गफला असून, त्याची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी केली. सुरक्षा राक्षकां संदर्भात विधानसभेत कोण्ही प्रश्न उपस्थित केले होते का? असा बागवे यांनी प्रश्न उपस्थित केला असता, सैनिक सुरक्षा मंडळा मार्फत प्रश्न उपस्थित झाला होता, असे जगताप म्हणाले. त्यावर अधिकाऱ्यांना धारेवर धरत माजी आमदार विजय काळे यांनी सुरक्षा राक्षकां संदर्भात प्रश्न उपस्थित केल्याची आठवण बागवे यांनी जगताप यांना करून दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.