Pune News : जादा दराने खडी खरेदी, पुरवठादारावर पालिकेची खैरात !

एमपीसी न्यूज : महापालिकेकडून 12 एमएम व 20 एमएम खडी खरेदी करण्यात येणार असून याची निविदा पालिकेकडून काढण्यात आली आहे. परंतु बाजारभावापेक्षा जास्त दर पालिकेने दिला असून यामधून पालिकेला 54 लाख रुपयांचे  नुकसान होणार असल्याची बाब समोर आली आहे. एकीकडे कोरोनामुळे विकास कामांच्या खर्चाला कात्री लावणारी पालिका दुसरीकडे जादा दराने खडी खरेदी करत पुरवठादारावर मेहेरबान होत खैरात वाटत असल्याचा आरोप केला जात आहे.

पालिकेच्या पथ विभागाने नुकत्याच  दोन निविदा प्रसिद्ध केल्या असून पालिकेच्या येरवडा बॅच मिक्स प्लांट मार्फत रस्ते डांबरीकरण व दुरुस्ती विषयक कामाकरिता 12 एमएम व 20 एमएम आकाराची खडी घेतली जाणार आहे. ही खडी घेण्यासाठी पुरवठादारांकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत. या निविदा 1 कोटी 90 लाख रुपयांच्या आहेत. पालिकेने 20 एमएम व 12 एमएम खडी पुरविण्यासाठी 1 हजार 163 रुपये 85 पैसे प्रती क्युबिक मीटर दर आकारला आहे. हा दर ब्रासमध्ये मोजल्यास 3 हजार 491 रुपये प्रती ब्रास आहे. परंतू, बाजारभावाप्रमाणे हा दर 2 हजार 400 ते 2 हजार 500 रुपये प्रती ब्रास आहे.

पालिकेने काढलेल्या निविदेमध्ये बाजारभावापेक्षा प्रती ब्रास 991 रुपयांचा अधिक दर देण्यात आला आहे. पालिका 8 हजार 162.54 क्युबिक मीटर म्हणजेच 2 हजार 720 ब्रास खडी खरेदी करणार आहे. या खरेदीमधून 991 रुपयांप्रमाणे 2 हजार 720 ब्राससाठी 27 लाख रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. दोन निविदांची मिळून ही रक्कम 54 लाख रुपये होत आहे.

पालिकेला लाखो रुपयांचा आर्थिक तोटा या निविदांमधून होणार आहे. या दोन्ही निविदा त्वरित रद्द करून पालिकेचे होणारे नुकसान टाळण्याची मागणी वडगाव शेरी नागरिक मंचातर्फे पालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. तसेच चौकशी करून या निविदा रद्द करण्याची मागणी करण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून निवेदनाद्वारे केली असल्याचे शहर चिटणीस आशिष माने यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.