Pimpri News: महापालिकेचा अर्थसंकल्प गुरुवारी होणार सादर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2021-22 या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प येत्या गुरुवारी (दि.18) सादर होणार आहे. आगामी वर्ष निवडणुकीचे असल्याने अर्थसंकल्पातून  नवीन काय मिळणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. महापालिकेचा हा 39 वा अर्थसंकल्प असणार आहे. तर, आयुक्त राजेश पाटील यांचा पहिला अर्थसंकल्प असणार आहे.

गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता विशेष स्थायी समिती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत आयुक्त राजेश पाटील अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दरम्यान, मागीलवर्षी मूळ 5232 कोटी तर केंद्र सरकारच्या पुरस्कृत योजनांसह  6 हजार 627 कोटी 99 लाख रुपयांचा अर्थसंकल्प होता. यंदा किती कोटींचा अर्थसंकल्प असेल. त्यामध्ये वाढ होणार की घट होणार, शहरवासीयांना नवीन काय मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कोरोनामुळे महापालिकेचे उत्पन्न घटले आहे. आगामी वर्ष निवडणुकीचे आहे. त्यापार्श्वभूमीवर कोणत्या नवीन घोषणा केल्या जातात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अर्थसंकल्प तयार केला आहे. अर्थसंकल्पावर त्यांची छाप असणार आहे. त्यांची शुक्रवारी (दि.12) पुण्यात नोंदणी महानिरीक्षकपदी बदली झाली. हर्डीकर प्रशासनाने तयार केलेला अर्थसंकल्प नवनियुक्त आयुक्त राजेश पाटील स्थायी समितीला सादर करतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.