Pimpri : पिंपरीगावातील म्हाडाचा प्रकल्प आयुक्तांनी बंद करावा – नगरसेवक बाबू नायर 

एमपीसी न्यूज – म्हाडाने मोरवाडी येथील गृह प्रकल्पातील मोकळी जागा 15 वर्षांपासून विकसित केली नाही. तसेच महापालिककडे देखील जागा हस्तांतरित केली नाही. असे असताना बांधकाम परवानगी विभागाने पुर्णात्वाचा दाखला दिला आहे. मोकळी जागा दिली नसल्याने नागरिक उद्यान, विरंगुळा केंद्र या सुविधांपासून वंचित आहेत. त्यामुळे महापालिकेने तातडीने म्हाडाकडून मोकळी जागा ताब्यात घेऊन विकसित करावी, अशी मागणी संत ज्ञानेश्वर सहकारी गृहरचना फेडरेशनचे अध्यक्ष व नगरसेवक बाबू नायर यांनी केली आहे. जोपर्यंत जागा ताब्यात दिली जात नाही. तोपर्यंत पिंपरीगावातील म्हाडाच्या प्रकल्पाचे काम महापालिका आयुक्तांनी बंद करावे. अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात नगरसेवक नायर यांनी म्हटले आहे की, मोरवाडी येथे म्हाडाने 16 एकर जागेमध्ये 20 वर्षापूर्वी सुमारे दोन हजार सदनिका बांधल्या आहेत. त्यापैकी दीड एकर मोकळी जागा महापालिकेला देणे आवश्यक होते. तथापि, म्हाडाने आजपर्यंत मोकळी जागा विकसित केली नाही. हा सदनिका धारकांवर अन्याय झाला आहे. नियमांप्रमाणे म्हाडाने ती मोकळी जागा विकसित करुन महापालिकेच्या ताब्यात देणे आवश्यक आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

मोकळी जागा मिळाल्यास महापालिकेच्या माध्यमातून नागरी सुविधा विकसित करता येतील. उद्यान, विरंगुळा केंद्र, क्रींडागण अशा सुविधा नागरिकांना देता येतील. जागा ताब्यात नसल्याने या सुविधांपासून नागरिक मागील 15 वर्षांपासून वंचित आहेत. प्रामणिकपणे कराचा भरणा करुन त्यांना सोयी-सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे रहिवाशांमध्ये संताप असून ते आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.

महापालिकेच्या चुकीच्या कारभाराचा फटका रहिवाशांना बसला आहे. बांधकाम परवानगी, भुमी जिंदगी आणि नगररचना विभाग यांच्यात समन्वय नाही. मोकळी जागा महापालिकेला दिली नसताना बांधकाम परवानगी विभागाने म्हाडाला बांधकाम पुर्णत्वाचा दाखला दिला आहे. म्हाडाकडे मोकळी जागा देण्याबाबत दीड वर्षांपासून पाठपुरावा करत आहे. परंतु, म्हाडाचे अधिकारी प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे जोपर्यंत मोकळ्या जागेचा ताबा देत नाहीत. तोपर्यंत पिंपरीगावातील म्हाडाचा प्रकल्प थांबविण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक नायर यांनी निवेदनातून केली आहे.

खासगी बांधकाम व्यावसायिक जोपर्यंत मोकळी जागा विकसित करुन देत नाही. तोपर्यंत त्याला बांधकाम पुर्णात्वाचा दाखला कायद्यानुसार देता येत नाही. म्हाडाने मोकळी जागा विकसित करणे देणे अपेक्षित आहे. परंतु, जागा विकसित करुन देणे शक्य नाही झाल्यास मोकळी जागा महापालिकेच्या ताब्यात देणे गरजेचे आहे. जेणेकरुन महापालिका जागा विकसित करुन सोयी-सुविधा उपलब्ध करुन देईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.